नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या संकंटामध्ये डबघाईला आलेला भारतीय अर्थव्यवस्थ हळूहळू पटरीवर येताना दिसत आहे. ऑक्टोबर महिन्यातील वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीच्या आकडेवारीवरुन हे दिसून येत आहे. कोरोना काळात मागील फेब्रुवारी महिन्यापासून जीएसटी संकलन पहिल्यांदा एक लाख कोटींच्या पुढे गेलं आहे. अर्थ मंत्रालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
ऑक्टोबर 2020 मध्ये 1,05,155 कोटी रुपये सकल जीएसटी (वस्तु आणि सेवा कर) महसूल संकलन झाले आहे. ज्यात सीजीएसटी 19,193 कोटी रुपये, एसजीएसटी 25,411 कोटी रुपये, आयजीएसटी 52,540 कोटी रुपये (मालाच्या आयातीवर संकलित 23,375 कोटी रुपयांसह ) आणि उपकर (सेस) 8,011 कोटी रुपये (मालाच्या आयातीवर संकलित 932 कोटी रुपयांसह ) समावेश आहे. ऑक्टोबर महिन्यासाठी 31 ऑक्टोबर , 2020 पर्यंत दाखल करण्यात आलेल्या जीएसटीआर-3बी विवरणपत्रांची एकूण संख्या 80 लाख आहे. जीएसटी संकलनामध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातून ऑक्टोबर 2020 मध्ये 15 हजार 799 कोटींचं जीएसटी संकलन झालं आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये 15 हजार 109 कोटींचं जीएसटी संकलन झालं होतं.
सरकारने नियमित निपटारा स्वरूपात आयजीएसटीमधून सीजीएसटीसाठी 25,091 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी 19,427 कोटी रुपये दिले आहेत. ऑक्टोबर 2020 मध्ये नियमित निपटारा केल्यानंतर केन्द्र सरकार आणि राज्य सरकारे यांनी मिळवलेला एकूण महसूल सीजीएसटीसाठी 44,285 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी 44,839 कोटी रुपये आहे..
या महिन्यात मिळालेला जीएसटी महसूल गेल्या वर्षी याच कालावधीत मिळालेल्या महसुलाच्या तुलनेत 10 टक्के अधिक आहे. या महिन्यात मालाच्या आयातीतून मिळालेला महसूल गेल्या वर्षीच्या तुलनेत 9 टक्के अधिक होता आणि देशांतर्गत व्यवहारांमधून (सेवांच्या आयातीसह ) प्राप्त महसूल 11 टक्के अधिक होता. जीएसटी महसुलातील वाढ जुलै , ऑगस्ट आणि सप्टेंबर 2020 च्या तुलनेत अनुक्रमे (-)14, -8 आणि 5 टक्के वाढ नोंदली गेली जी अर्थव्यवस्थेतील सुधारणा आणि महसुलातील वाढ दर्शवते.
गेल्या सहा महिन्यातील जीएसटी संकलन
एप्रिल- 32 हजार 172 कोटी
मे - 62 हजार 151 कोटी
जून - 90 हजार 917 कोटी
जुलै - 87 हजार 422 कोटी
ऑगस्ट- 86 हजार 449 कोटी
सप्टेबर- 95 हजार 480 कोटी
ऑक्टोबर- 1 लाख 5 हजार 155 कोटी