नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या काळात डबघाईला आलेली देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढू लागली आहे. उत्सवातील मागणी आणि अर्थव्यवस्थेच्या वेगामुळे जीएसटी कलेक्शन डिसेंबरमध्ये वाढून 1 लाख 15 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, जीएसटी संकलनाने डिसेंबरमध्ये 1.15 लाख कोटी रुपयांची उच्चांकाची पातळी गाठली गेली, ही उत्सवातील मागणी आणि अर्थव्यवस्थेतील सुधार दर्शवते.
अर्थ मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, डिसेंबर 2020 मध्ये जीएसटी महसूल 1 लाख 15 हजार 174 कोटी होता. वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यापासून एखाद्या महिन्यातील आतापर्यंतचं हे सर्वाधिक संकलन आहे. गेल्या 21 महिन्यांतील ही सर्वाधिक मासिक महसूल वाढ आहे, असं अर्थ निवेदनात म्हटले आहे. जीएसटी चोरी आणि बनावट बिले आणि देशातील बदलांच्या विरोधात देशव्यापी मोहिमेनंतर आणि आर्थिक सुधारणांमुळे हे शक्य झाले, असंही म्हटलं आहे.
नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत एकूण 87 लाख जीएसटीआर -3 बी रिटर्न भरले होते. गेल्या महिन्याच्या तुलनेत आयात केलेल्या वस्तूंच्या उत्पन्नात 27 टक्के वाढ झाली असून देशांतर्गत व्यवहारातून (आयात सेवांसह) महसूल गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ टक्क्यांनी वाढला आहे.
जीएसटी महसूल सुधारण्याच्या अलिकडच्या ट्रेंडच्या अनुषंगाने सलग तिसर्या महिन्यात महसूल संकलनाने 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. डिसेंबर 2020 मधील एकूण महसूल संकलन डिसेंबर 2019 च्या तुलनेत 12 टक्के जास्त होते. डिसेंबरमध्ये केंद्रीय जीएसटी संकलन 21 हजार 365 कोटी रुपये, राज्य जीएसटी संकलन 27 हजार 804 कोटी रुपये, एकात्मिक जीएसटी, 57 हजार 426 कोटी रुपये आणि सेस 8550 कोटी आहे.