नवी दिल्ली : यंदाचा प्रजासत्ताक दिन हा ऐतिहासिक असणार आहे. कारण एकीकडे जवान राजपथावर परेड करतील तर दुसरीकडे देशाचा शेतकरीही दिल्लीच्या सीमांवर ट्रॅक्टर परेड करणार आहे. गेल्या 60 दिवसांपेक्षा अधिक काळ दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेले शेतकरी उद्या ट्रॅक्टर मोर्चाच्या माध्यमातून आपली ताकद सरकारला दाखवतील. गेल्या आठवडाभरापासून ट्रॅक्टर परेडला परवानगी मिळणार की नाही याबद्दल सस्पेन्स होता. पण अखेर परवानगी मिळाली आहे.


प्रजासत्ताक दिन म्हटलं की आपल्याला राजपथावरचं संचलन आठवतं. पण उद्या देशाचे जवान आणि किसान दोघेही राजधानी दिल्लीत परेड करताना दिसतील. जवानांसोबत रणगाडे तर शेतकऱ्यांसोबत असेल त्यांचा शेतातला साथीदार ट्रॅक्टर. दिल्लीच्या चार सीमांवर जिथे आंदोलन सुरु आहे त्या चारही सीमांवरुन उद्या हे ट्रॅक्टर दिल्लीत बाहेर पडतील. 26 जानेवारीची परेड संपली की ही परेड सुरू होईल. पोलिसांचा दावा 30 हजार ट्रॅक्टर असतील तर शेतकऱ्यांचा दावा अडीच लाख ट्रॅक्टर सहभागी होणार असल्याचा आहे.


शेतकरी आणि सरकारमध्ये आत्तापर्यंत 10 बैठका पार पडल्या, त्यानंतरही कुठला तोडगा निघू शकलेला नाही. कृषी कायद्यांना दीड वर्षासाठी स्थगिती देण्याची एक मोठी ऑफरही सरकारनं देऊन पाहिली. मात्र, कायदा मागे घ्या याच मागणीवर शेतकरी ठाम आहेत. सरकारला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपली ताकद दाखवून देण्यासाठीच त्यांनी आता ट्रॅक्टर मोर्चाची जोरात तयार सुरु केली आहे.


पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशच्या गावागावातून हे ट्रॅक्टर दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून पोहचत आहेत. कुठल्याही परिस्थितीत हिंसा करणार नाही, शांततेत मोर्चा काढू असं आश्वासन शेतकरी नेत्यांनीही पोलिसांना दिलं आहे.


दिल्लीतल्या आऊटर रिंग रोडवरून ही परेड काढण्याचा शेतकऱ्यांचा इरादा होता. या ट्रॅक्टर मोर्चाला बदनाम करण्यासाठी पाकिस्तानात 300 ट्विटर हँडल तयार झाल्याचा दावाही दिल्ली पोलिसांनी केला. दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजन्स युनिटचे आयुक्त दीपेंदर पाठक यांनी हा दावा केला. 13 ते 18 जानेवारी या काळात हे अकाऊंट पाकिस्तानात तयार झाले असून त्यात या आंदोलनाच्या माध्यमातून भारतात कसं वातावरण बिघडेल असा प्रयत्न असल्याचा पोलिसांचा दावा आहे. पण शेतकऱ्यांनीही याबाबतीत शांततेचं पूर्ण आश्वासन सरकारला दिलं आहे.


दिल्ली पोलिसांनी सर्व शक्यता लक्षात घेऊन ट्रॅक्टर मोर्चाचा हा मार्ग ठरवला आहे. ज्या मार्गावर इमर्जन्सी हॉस्पिटलची सुविधा आहे. त्याच मार्गावर मोर्चाची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता उद्या जितकी उत्सुकता राजपथावरच्या परेडची असेल तितकीच शेतकऱ्यांच्या या ट्रॅक्टर परेडचीही असेल. शेतकऱ्यांचं हे वादळ सरकारच्या मनोबलावर काय परिणाम करतं हे पाहणंही औत्सुक्याचं असेल.


Farmers Protest | शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी