Delhi Mundka Fire : दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशन जवळील इमारतीला लागलेल्या भीषण आगीमध्ये 27 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली आहे. या घटनेतील जखमींवर उपचार सुरु आहेत. शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली, नंतर ती आग तिसऱ्या मजल्यापर्यंत पसरली. या अग्नितांडवादरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक क्रेन आगीत अडकलेल्या लोकांचा जीव वाचवताना दिसत आहे.
एबीपीने क्रेन चालकांसोबत संवाद साधला. क्रेन चालक अनिल तिवारी आणि दयानंद तिवारी हे दोघे 25 वर्षांपासून या कामात कार्यरत आहेत. या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी चाप वाजेच्या सुमारात दोघे या परिसरातून जात असताना त्यांना समोरील इमारतीला आग लागून धुराचे लोट बाहेर पडताना दिसले. त्यानंतर या क्रेन चालकांनी इमारतीमध्ये अडकलेल्या लोकांना आगीतून बाहेर काढण्याचं काम सुरु केलं. क्रेन चालकांची डिवायडर तोडून रस्त्याच्या पलिकडे आग लागलेल्या इमारतीजवळ पोहोचले.
50 हून अधिक जणांचा वाचवला जीव
आग लागलेल्या इमारतीजवळ पोहोचताच तिथे लोक मदतीसाठी आरडाओरडा करत होते. पहिल्या मजल्यावर अग्नितांडव दिसत होते. तर दुसऱ्या मजल्यावरून धुराचे लोट बाहेर पडत होते. त्यानंतर त्यांनी क्रेनचा वापर करत दुसऱ्या मजल्यावरील काचा फोडल्या आणि अडकलेल्या सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. इमारतीमध्ये अडकलेल्यांमध्ये महिला आणि मुलांची संख्या जास्त होती. त्यांनी क्रेनच्या साहाय्याने बचावकार्य करत महिला आणि मुलांना बाहेर काढायला सुरुवात केली. दिड तास चाललेल्या या बचावकार्यामध्ये क्रेन चालकांनी 50 हून अधिक महिलांची सुखरुप सुटका केली.
क्रेनमधून अधिक लोकांना वाचवणे शक्य नव्हतं : क्रेन चालक
दरम्यान, आग अधिक वाढल्याने क्रेन चालकांनी तेथून पळ काढला. आग जास्त पसरल्याने क्रेनने लोकांना मदत करणे शक्य नव्हतं. आगीचे लोट दूरवर पसरू लागल्या. क्रेन चालक आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तोपर्यंत पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचलं होतं मात्र अग्निशमन दलाचं पथक तेथे पोहोचलं नव्हतं. क्रेनचे मालक सुधीर कुमार यांनी सांगितले की, क्रेन चालकांना शक्य होतं तोपर्यंत त्यांनी लोकांना वाचवलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या