Congress News : सध्या उदयपूरमध्ये काँग्रसचे चिंतन शिबिर सुरु आहे. आज चिंतन शिबिराचा शेवटचा दिवस आहे. मागच्या दोन दिवसात काँग्रेसच्या नेत्यांनी विविध विषयांवर चर्चा केली.  दरम्यान, उदयपूर चिंतन शिबिरात ज्या प्रकारची चर्चा आणि निर्णय घेतले जात आहेत, त्यावरुन असे दिसते आहे की काँग्रेसच्या जी-23 गटाच्या सर्व सूचनांची सकारात्मक दखल घेत आहेत. आवश्यक ते बदल करत असल्याची माहिती काँग्रेसच्या जी-23 नेत्यांच्या गटामधील एका नेत्याने दिली आहे. काँग्रेससाठी ही मोठा दिलासा देणारी बातमी आहे. कारण काँग्रेस नेतृत्वासमोरील सर्वात मोठे आव्हान हे आपल्याच नाराज ज्येष्ठ नेत्यांना कसे पटवायचे हे होते.
 
या चिंतन शिबिरात G-23 चे सर्व नेते उपस्थित आहे. गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, आनंद शर्मा, शशी थरुर, मनीष तिवारी आणि अखिलेश प्रसाद सिंग या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, कपिल सिब्बल वगळता सर्व नेत्यांनी या चिंतन शिबिराला हजेरी लावली. चिंतन शिबिरातही खूप मोकळ्या पद्धतीने चर्चा झाली आहे. सर्व मुद्द्यांवर झालेल्या चर्चेदरम्यान बराच विरोधही व्यक्त करण्यात आला आहे. परंतू, सर्व काही लोकशाही मार्गाने सुरु असल्याची माहिती काँग्रेसच्या नेत्याने दिली आहे. आम्हाला विश्वास आहे की G-23 गटाच्या नेत्यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्यांवर चर्चा होईल असेही सांगण्यात आले आहे.


तीन दिवसीय चिंतन शिबिरात सहा वेगवेगळ्या गटातील नेते विविध विषयांवर चर्चा करत आहेत. या चर्चेच्या निकालाला काँग्रेस कार्यसमिती 'नवीन ठराव' म्हणून मान्यता देईल. दरम्यान, या शिबिरात  काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाहीत. पण राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे अशी मागणी यावेळी काही नेत्यांनी केली आहे. तसेच सक्रिय असणाऱ्या नेत्याकडेच काँग्रसचे अध्यक्षपद देण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली आहे. 


काँग्रेसमध्ये संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे उदयपूर चिंतन शिबिरात काँग्रेस अध्यक्षाबाबत औपचारिक चर्चा झाली नसून, पक्षनेतृत्वात स्पष्टता हवी, अशी मागणी नेत्यांकडून होत आहे. यावेळी राहुल गांधी यांनीच काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे.यापूर्वी काँग्रेस कार्यकारिणीच्या सर्व बैठकांमध्ये राहुल गांधींना पुन्हा अध्यक्ष करण्याची मागणी वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्चमध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीच्या झालेल्या बैठकीत राहुल यांनी याबाबत आपण गांभीर्याने विचार करत असल्याचे नेत्यांना सांगितले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर सोनिया गांधी यांच्यावर पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी आली होती.