Controversial Statement: देशात हिंदी भाषेवरून वाद वाढताना दिसत आहे. यावरूनच आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य समोर आली आहेत. अशातच तामिळनाडूचे उच्च शिक्षण मंत्री के पोनमुडी यांनी हिंदी भाषिकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. हिंदी भाषेवर वादग्रस्त वक्तव्य करताना ते म्हणाले की, जे लोक हिंदी बोलतात ते एकतर द्वितीय श्रेणीची नोकरी करतात किंवा पाणीपुरी विकतात. कोईम्बतूर येथील भरथियार विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करत असताना पोनमुडी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. लोकांना संबोधित करताना ते म्हणाले की, जर हिंदी भाषा शिकल्याने जास्त रोजगार मिळतो यावर वाद होत असेल तर हिंदी भाषिक इथे पाणीपुरी का विकत आहेत.


हिंदीपेक्षा इंग्रजीला जास्त महत्त्व 


पोनमुडी यांनी लोकांना संबोधित करताना सांगितले की, भाषा म्हणून हिंदीपेक्षा इंग्रजी अधिक महत्त्वाची आहे. हिंदी भाषिक लोक दुसऱ्या दर्जाच्या नोकऱ्या करतात, असा दावा त्यांनी कार्यक्रमात उपस्थित लोकांसमोर केला. पोनमुडी म्हणाले की, जर तमिळ विद्यार्थ्यांना भाषा शिकायची असेल तर हिंदी हा पर्यायी विषय असला पाहिजे, सक्तीचा विषय नाही. ते म्हणाले की, तामिळनाडू सरकार दोन भाषा प्रणाली लागू करण्यासाठी वचनबद्ध आहे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चांगल्या गोष्टी लागू केल्या जातील.




शिक्षण व्यवस्थेत तामिळनाडू आघाडीवर


विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवीही उपस्थित होते. यावेळी बोलताना पोनमुडी म्हणाले की, इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून शिकविली जात असताना, अशा परिस्थितीत कोणालाही हिंदी शिकण्याची इच्छा का होईल? तमिळनाडू राज्य शिक्षण व्यवस्थेत आघाडीवर असल्याचा दावाही त्यांनी केला. तमिळ विद्यार्थी कोणतीही भाषा शिकण्यास तयार असतात. हिंदीपेक्षा इंग्रजी ही मौल्यवान भाषा असल्याचे ते म्हणाले. इंग्रजी आता आंतरराष्ट्रीय भाषा बनली आहे, असेही ते म्हणाले आहेत.