Coronavirus Today : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सध्या घटताना दिसतोय. देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 10 हजार 197 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. अशातच 301 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या एक लाख 28 हजार 555 सक्रिय रुग्ण आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, 527 दिवसांनी देशात सर्वात कमी कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. जाणून घ्या देशातील सद्यस्थिती...
आतापर्यंत 4 लाख 63 हजार 530 रुग्णांचा मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, या महामारीमुळे जीव गमावलेल्यांची संख्या वाढून 4 लाख 64 हजार 153 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत एकूण 3 कोटी 38 लाख 73 हजार 890 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत, आतापर्यंत 113 कोटींहून अधिक लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल 67 लाख 82 हजार 42 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत 113 कोटी 68 लाख 79 हजार 685 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत.
राज्यात दैनंदिन कोरोनाबाधितांमध्ये घट; तर रिकव्हरी रेट 97.64 टक्क्यांवर
कोरोनाबाधितांच्या (Coronavirus Today) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात काल (मंगळवारी) 886 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 948 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 69 हजार 739 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.64 टक्के आहे.
राज्यात काल (मंगळवारी) 34 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 11 हजार 847 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 98, 703 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1024 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 41 , 55, 107 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करा, राजेश टोपेंची मोदी सरकारकडे मागणी
कोविड प्रतिबंधात्मक कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी करावे, अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे केली आहे. मंगळावरी राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची निर्माण भवन येथे भेट घेतली. याभेटीदरम्यान राजेश टोपे यांनी राज्यातील परिस्थितीची माहिती मनसुख मांडविया यांना माहिती दिली. यावेळी त्यांनी कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची मागणी केली.
राजेश टोपे यांनी मंगळवारी केंद्रीय मंत्री मांडविया यांना राज्यातील कोरोना परिस्थितीबद्दल माहिती दिली. त्याशिवाय कोरोनावर मात करण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या उपाययोजना, लसीकरणाच्या बाबतीत मुंबई महानगरपालिकेने केलेले उल्लेखनीय काम यासारख्या विविध मुद्यांबाबत सविस्तर माहिती दिली. कोरोना लसीकरणाला वेग येण्यासाठी कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करावे, अशी विनंती केली. कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 84 दिवसांवरुन 28 दिवस करता येईल का? याबाबत फेरविचार करवा, जेणेकरुन लसीकरणाला वेग येईल, असं मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं. काही देशांमध्ये लसीकरणाच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्यात आलेय. त्याप्रमाणे आपल्या देशातही विचार व्हावा. परदेशी नोकरी अथवा शिक्षणासाठी जाणारे नागरिकांसाठी दोन मात्रांमधील अंतर कमी करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे याचाही विचार व्हावा, अशी विनंती राजेश टोपे यांनी मांडविया यांना केली.