Covid Positive Patient Scam : औरंगाबादमध्ये कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या ऐवजी दुसरेच बनावट रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली. औरंगाबाद महानगर पालिकेच्या तक्रारीनंतर सहा जणांच्या विरोधात सिडको पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेले दोन रुग्ण, त्यांच्या जागी उपचार घेण्यासाठी आलेले दोन तरुण आणि याप्रकरणी मध्यस्थी करणारे दोन अशा सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


दहा दिवसाचे दहा हजार मिळणार, शिवाय खा-प्या आणि मजा करा. अशी मध्यस्थाने रुग्णाची जागा घेणाऱ्याला ऑफर दिली होती. यासाठी जालन्यातील दोन तरुण तयार झाले. ते तरुण जालन्याहून औरंगाबादेत पोहोचले आणि थेट कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसोबत उपचार घेऊ लागले. पण नंतर ही बाब आरोग्य आधिकाऱ्याच्या लक्षात आली. पोलिसांनी रुग्णालयाच्या तक्रारीनंतर बनावट रुग्णांना ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु आहे.


या सगळ्या प्रकरणात सखोल चौकशीअंती पॉझिटिव्ह रुग्ण आणि उपचारासाठी आलेल्या बनावट रुग्णांच्या मध्ये दोन मध्यस्थ आहेत. औरंगाबाद पोलिसांनी या सगळ्या सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मध्यस्थ असल्याने यात अशाप्रकारे गुन्हे करण्याचे रॅकेट आहे का? हेदेखील तपासलं जाणार असल्याचं सिडको एमआयडीसी पीआय विठ्ठल पोटे यांनी सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार जे बनावट रुग्ण उपचारासाठी आले होते त्यांच्याकडे येतानाच एका खाजगी रुग्णालयात रेफर सर्टिफिकेट होतं. त्यामुळे इन्शुरन्ससाठी तर हे सगळं सुरू नव्हतं ना? याचाही पोलिस तपास करत आहेत.


खरेच ते रुग्ण पॉझिटिव्ह होते का?
मुळातच सिद्धार्थ गार्डनमध्ये तपासणी करताना पॉझिटिव्ह असलेले रुग्ण खरेच पॉझिटिव्ह होते का? याची देखील मनपा तपासणी करत आहे आणि त्यासाठी तज्ञांची कमिटी नेमली आहे, असं मेल्ट्रॉन रुग्णालयाच्या प्रमुख डॉ दीपाली  मूगदळकर यांनी सांगितलं. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha