Bharat Jodo Yatra in Delhi: काँग्रेसची (Congress) भारत जोडो यात्रेनं (Bharat Jodo Yatra) आता राजधानीत प्रवेश केला आहे. आज शनिवारी (24 डिसेंबर) भारत जोडो यात्रेचा 180वा दिवस असून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्त्वात सुरू असणारी ही यात्रा शनिवारी सकाळी साडेसहा वाजता बदरपूर सीमेवरून दिल्लीत दाखल झाली आहे. भारत जोडो यात्रा सकाळी साडेदहा वाजता आश्रम चौकाजवळ पोहोचेल. यानंतर दुपारी साडेचार वाजता ही यात्रा लाल किल्ल्यावर (Lal Qila) पोहोचेल. दरम्यान, दिल्ली काँग्रेसनं भारत जोडो यात्रेत सहभागी होणाऱ्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना मास्क घालून येण्याचे निर्देश दिले आहेत.


राहुल गांधी लाल किल्ल्यावरून भाषण देणार 


हरियाणातील फरिदाबाद येथील NHPC मेट्रो स्टेशनपासून काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली. भारत जोडो यात्रा संध्याकाळी साडेचार वाजता लाल किल्ल्यावर पोहोचणार आहे. इथूनच राहुल गांधी भाषण करणार आहेत. राहुल गांधींच्या या दौऱ्यात मोठ्या संख्येनं लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. भारत जोडो यात्रेतील गर्दी पाहता वाहतूक पोलिसांनीही लोकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे.






सर्वसामान्य आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसह काही सिनेकलाकारही भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. आज प्रसिद्ध अभिनेते कमल हसन भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत सहभागी होणार आहेत. त्यानंतर राहुल गांधी राजघाट आणि शांती स्थळावर जाऊन पुष्पांजली अर्पण करणार आहेत. 


दिल्लीतील भारत जोडो यात्रेचा मार्ग


भारत जोडो यात्रेत सहभागी लोक दुपारी आश्रम चौकाजवळील धर्मशाळेत जेवण आणि विश्रांती घेतील. त्यानंतर ही यात्रा निजामुद्दीन, इंडिया गेट सर्कल, आयटीओ, दिल्ली कॅंट, दर्यागंज मार्गे लाल किल्ल्यावर पोहोचेल. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे अनेक नेते राजघाट, वीरभूमी, शक्तीस्थळ आणि शांती वन येथे पोहोचून श्रद्धांजली वाहणार आहेत.


यात्रेसंदर्भात सूचना 


काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी म्हटलं आहे की, त्यांचा पक्ष सरकारनं जारी केलेल्या सर्व प्रोटोकॉलचं पालन करेल. भाजप कोविडचे राजकारण करत असून भारत जोडो यात्रेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे, दिल्ली काँग्रेसनं आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि यात्रेत सहभागी होणाऱ्या नेत्यांना मास्क घालून येण्याच्या सूचना दिल्या आहेत. 


7 सप्टेंबरपासून हा प्रवास सुरू झाला


विशेष म्हणजे, काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला  (Bharat Jodo Yatra) 7 सप्टेंबरला कन्याकुमारी (Kanyakumari) येथून सुरुवात झाली होती. या यात्रेनं आतापर्यंत 9 राज्यांचा समावेश केला आहे. यामध्ये तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा या राज्यांचा समावेश आहे. मात्र, हरियाणात दुसरा टप्पा अजून व्हायचा आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर 3 जानेवारी 2023 रोजी पदयात्रा पुन्हा सुरू होईल. नवीन वर्षात यूपी, हरियाणानंतर ही यात्रा पुन्हा पंजाब आणि जम्मू-काश्मीरसाठी रवाना होणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


रामसेतूच्या अस्तित्वाचा अद्याप कोणताही ठोस पुरावा नाही, कारण...; केंद्र सरकारची संसदेत माहिती