Ravish Kumar : मी एनडीटीव्ही (NDTV) सोडल्यानंतर तिथे खूप बदल झाले आहेत. त्या ठिकाणी भाजपचे प्रवक्ते येत आहेत. ते तिथे का येत आहेत? असा सवाल ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार (Ravish Kumar) यांनी उपस्थित केला. एनडीटीव्हीचा राजीनामा देण्याचा माझा वैयक्तिक निर्णय असल्याचंही त्यांनी सांगितले. रवीश कुमार यांनी एबीपी माझाशी (ABP Majha) संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. सरकारचे कौतुक करायला धाडस असावं लागतं असं उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी एका मुलखातीत सांगितले होते. याचा अर्थ काय? असेही ते म्हणाले. देशाच्या प्रगतीसाठी आम्ही उद्योग करत असल्याचे प्रत्येक उद्योगपती सांगतात. मात्र, त्यांच्या उद्योगातून काय होतेय ते आपल्याला माहित असल्याचं रवीश कुमार म्हणाले.


मला एनडीटीव्हीचा राजीनामा द्यायचाच होता. राजीनामा देणं हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. प्रत्येक वेळेस काढलं जातेच असे नाही मात्र, तुम्हाला सोडून जाण्यास भाग पाडलं जातं असंही रवीश कुमार म्हणाले. बाकीच्या सहकाऱ्यांनी राजीनामा द्यावा किंवा न द्यावा हा त्यांचा निर्णय असल्याचे रवीश कुमार म्हणाले. राजीनामा देण्याचा माझा वैयक्तिक निर्णय नसता तर आम्ही सर्वांनी मिळून राजीनामा दिला असता असेही ते म्हणाले. रवीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रणव रॉय यांनी कुठलीच प्रतिक्रिया का दिली नाही? असा सवालही रवीश कुमार यांना विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, काय बोलायचे हा त्यांचा निर्णय आहे. त्यांनी काय बोलावं याबाबत मी बोलणार नसल्याचे रविश कुमार म्हणाले. अदानी यांच्याकडून प्रणव रॉय यांना काय ऑफर आली होती याबाबत मला काही माहिती नसल्याचे ते म्हणाले.


 



अदानी आणि अंबानी यांच्यात मोठा फरक आहे


अदानी आणि अंबानी यांच्यात मोठा फरक आहे. अंबानी यांचे प्रतिनिधीत्व करणारा कोणताही व्यक्ती एनडीटीव्हीच्या संचालक मंडळात नव्हता. मात्र, आता एनडीटीव्हीमध्ये अदानी ग्रुपचे संजय पुगलिया आल्याचे रवीश कुमार म्हणाले. प्रणॉय रॉय आणि राधिका रॉय यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच कंपनीच्या संचालक मंडळावर तीन नवीन संचालकांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये अदानी ग्रुपचे सीईओ सुदिप्ता भट्टाचार्य, संजय पुगलिया आणि सेंथिल सिन्नैया चेंगलवरायन यांचा समावेश होता. अंबानी यांच्या कोणत्याही व्यक्तीचा एनडीटीव्हीच्या कामकाजात सहभाग नव्हता. आता मात्र, अदानी यांचे सहकारी संजय पुगलिया हे एनडीटीव्हीच्या मंडळात आल्याचे रविश कुमार म्हणाले.  संजय पुगलिया यांना एनडीटीव्हीचे कोणकोणते पत्रकार भेटले याबाबतची मला माहिती नाही. ही अफवा आहे की खरचं भेटले याबाबत काही कल्पना नसल्याचंही रविश कुमार यांनी सांगितलं.


गेल्या आठ वर्षात अनेक वृत्तनिवेदकांना काढण्यात आलं 


एनडीटीव्ही वृत्तसमुहाची मालकी आता प्रख्यात उद्योगपती गौतम अदानी यांच्याकडे गेली आहे. एनडीटीव्हीची प्रवर्तक कंपनी असलेल्या आरआरपीआर होल्डिंगमध्ये अदानी यांचे 29.18  टक्के शेअर्स आहेत. एनडीटीव्ही वृत्तसमुहाची मालकी अदानी यांच्याकडे जाण्यापूर्वीच त्यांनी एनडीटीव्हीच्या कामकाजात लक्ष घातल्याचे रवीश कुमार म्हणाले. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या अद्याप लोकांसमोर आल्या नाहीत. गेल्या आठ वर्षात अनेक वृत्तनिवेदकांना काढण्यात आले आहे. तर काही वृत्तनिवेदकांना सोडण्यास भाग पाडल्याचे रवीश कुमार म्हणाले. अनेक पत्रकारांना जेलमध्येही टाकण्यात आलं. काही पत्रकारांना ट्रोल करण्यात आलं, यामध्ये महिला पत्रकारांचा देखील समावेश असल्याचे रविश कुमार म्हणाले.       


सरकार खोटं बोलत असताना सत्य परिस्थिती सांगणं माझं काम


मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर त्यांच्याकडे नव्हती म्हणूनच भाजपचे प्रवक्ते येत नव्हते असेही रविश कुमार म्हणाले. माझा प्रत्येक टीव्ही शो हा फॅक्टच्या आधारावर होता. मी कोणत्याही मुद्याचा एका बाजूने विचार केला नाही. विरोध करण्यासाठी विरोध केला नसल्याचं रवीश कुमार यांनी सांगितलं. सरकार खोट बोलत होते त्यामुळं मी सत्य लोकांसमोर ठेवल्याचे रविश कुमार म्हणाले. सरकार ज्या दिवशी खोट बोलेल त्याच दिवशी सत्य परिस्थिती सांगणं माझं काम असल्याचे रवीश कुमार म्हणाले. 


(शब्दांकन : गणेश लटके)


महत्त्वाच्या बातम्या:


Ambani-Adani : अंबानी-अदानी यांच्या महाराष्ट्रातील बड्या राजकारण्यांच्या भेटी, चर्चांना उधाण