Monkeypox test in India : देशात कोरोना (Corona) संसर्गासोबतच मंकीपॉक्स (Monkeypox) हा आजारही हातपाय पसरताना दिसत आहे. मंकीपॉक्स विषाणूची (Monkeypox Virus) ओळख पटण्यासाठी आधी प्रयोगशाळेत नमुने पाठवावे लागत होते. मात्र, आता यासाठी सोपा मार्ग सापडला आहे. पहिलं स्वदेशी मंकीपॉक्स टेस्ट किट लाँच करण्यात आलं आहे. ट्रांसएशिया एर्बा मंकीपॉक्स आरटी पीसीआर किट (Monkeypox RT-PCR) अतिशय संवेदनशील असून हाताळायला फार सोपं आहे. त्यामुळे आता मंकीपॉक्स विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांचा अहवाल लवकर येऊन त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यास मदत होणार आहे. केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार अजयकुमार सुद यांच्या हस्ते पहिलं स्वदेशी मंकीपॉक्स आरटीपीसीआर किट लाँच करण्यात आलं आहे. ट्रांसएशिया एर्बा मेडिकल्स (Transasia Biomedicals)या फार्मा कंपनीनं हे मंकीपॉक्स आरटीपीसीआर किट (RT-PCR) तयार केलं आहे.
मंकीपॉक्समुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालय अलर्टवर
देशात मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रकरणांमुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालय अलर्ट मोडवर आलं आहे. यानंतर आता केंद्र सरकारकडून पहिलं भारतीय मंकीपॉक्स टेस्ट किट लाँच करण्यात आलं आहे. आंध्र प्रदेशातील मेडटेक झोन (AMTZ) येथे शुक्रवारी 18 ऑगस्ट रोजी हे किट लाँच करण्यात आलं आहे. त्यामुळे आता मंकीपॉक्स विषाणू संसर्ग झालेल्यांचं निदान होणं सोपं होणार आहे. त्यामुळे रुग्णांना वेळी उपचार मिळून मृत्यूचा धोकाही कमी होईल.
भारतात 10 जणांना मंकीपॉक्सची लागण
देशात मंकिपॉक्सच्या एकूण रुग्णांची संख्या दहावर पोहचली आहे. या रुग्णांमध्ये आठ पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. राजधानी दिल्लीमध्ये मंकीपॉक्सचे पाच रुग्ण आढळले आहेत, तर पाच रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. दिल्ली आणि केरळमधील प्रत्येकी एका रुग्णांला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर केरळमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच, आता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (Indian Council of Medical Research) म्हणजेच ICMR कडून मंकीपॉक्सच्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांमध्ये अँटीबॉडीजची उपस्थिती तपासण्यासाठी सेरो-सर्वेक्षण करण्याची शक्यता आहे. यासोबतच ICMR कडून मंकीपॉक्स रुग्णांच्या संपर्कात आलेले पण संसर्गाची लक्षणं नसणाऱ्या व्यक्तींचीही पुन्हा तपासणी करण्याची शक्यता आहे. मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य संघटनेने आणीबाणी घोषित केलं आहे.
उत्तम व्यवस्थापनाला मदत होईल
ट्रान्स एशियाचे संस्थापक-अध्यक्ष सुरेश वझिरानी यांनी म्हटलं आहे की, 'या किटच्या मदतीने मंकीपॉक्सचा संसर्ग लवकर ओळखला जाऊ शकतो. ट्रान्सएशिया एर्बा मंकीपॉक्स आरटी पीसीआर किट अतिशय संवेदनशील असून वापरण्यास सोपं आहे. यामुळे संक्रमणा पूर्वीचं निदान आणि उत्तम व्यवस्थापन करण्यास मदत होईल.'
महत्त्वाच्या इतर बातम्या