Sudhakarrao Naik : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांची 21 ऑगस्ट रोजी जयंती. सुधाकरराव नाईक यांना जलनायक म्हणून ओळखले जाते. कारण जलसंधारणाचे खरे कार्य सुधाकरराव नाईक यांनी केले आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ कायमचा नाहीसा करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र जलसंवर्धन खात्याची निर्मिती करून राज्यात भरीव काम केले. त्यामुळेच  महाराष्ट्र सरकारने 10 मे हा त्यांचा स्मृतिदिन 'जलसंधारण दिन' म्हणून घोषित केला आहे. 


महाराष्ट्रात विविध योजना आहेत. परंतु जलसंवर्धन करण्यासाठी कोणत्याही योजनेतून पुरेसा निधी नसल्यामुळे जलसंधारणाची कामे होत नाहीत. अशाने जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. हीच परिस्थिती राहीली तर येत्या पाच ते दहा वर्षात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल याचा अंदाज बांधून सुधाकरराव नाईक यांनी स्वतंत्र जलसंवर्धन खात्याची निर्मिती केली. अनेक योजनांवरील निधी जलसंधारणाकडे वळता केला. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जलसंवर्धनाची यशस्वी कामे त्यांच्या काळात झाली.  


 स्वतंत्र जलसंवर्धन खात्याची निर्मिती केल्यानंतर जलसंधारणाला राज्यात मोठी चालना दिली. राज्य जलसंधारण सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून सुधाकरराव नाईक यांनी महाराष्ट्रात झंझावती दौरे करून भूजलपातळी वाढविण्यासाठी कार्यक्रम आखले. 


'जलसंधारणाचे कार्य झाले नाही तर भविष्यात महाराष्ट्राचे वाळवंट होईल', असा इशाराच सुधाकरराव नाईक यांनी दिला होता. जलचळवळ जनचळवळ करण्यासाठी त्यांनी शेवटच्या काळात देखील क्षणाचीही उसंत घेतली नाही. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी 'जलक्रांतीचे जनक' या नात्याने त्यांचा स्मृतिदिन 'जलसंधारण दिन' म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.  


केवळ उठसूट फक्त धरणं न बांधता पाणी अडवण्याचा आणि जिरवण्याच्या उपाययोजना अंमलात आणाव्यात असे आदेश सुधाकरराव नाईक यांनी त्यावेळी दिले. जलसंधारणाची छोटी आणि महत्वाची कामं केली तर शेतकरी निराधार होणार नाही आणि जास्त जमिन सिंचनाखाली येऊ शकते आणि शेतकऱ्यांचे पुनर्वसनाचे प्रश्न कायमचे मिटतील या दृष्टीने त्यांनी ही तरतूद केली होती. सुधाकरराव यांच्या धाडसी निर्णयामुळेच त्यांना पाणीदार नेता म्हणून देखील ओळखले जात असे.  


यवतमाळमधील पुसदम येथील गहुली गावी सुधाकरराव नाईक यांचा जन्म झाला. वडील लोकनेते बाबासाहेब नाईक हे अत्यंत कडक शिस्तीचे आणि स्वभावाचे होते तर काका वसंतराव नाईक हे मायाळू स्वभावाचे होते. अशा जेष्ठांच्या तालमीत सुधाकरराव नाईक यांनी राजकारणाचे धडे गिरवले होते.