नवी दिल्ली :  इंधन, घरगुती गॅसचे दर दिवसागणिक वाढत असताना आता  औषधांच्या किंमतीदेखील वाढणार आहेत. आरोग्यासाठी अत्यावश्यक असलेल्या औषधांच्या किंमतीमध्ये 1 एप्रिलपासून वाढ होणार आहेत. जवळपास 800 औषधांचे दर 10 टक्क्यांनी वाढणार आहेत. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं महाग होणार आहे. कोरोना संकट आल्यापासून औषधांच्या किमती वाढवल्या जाव्यात अशी मागणी या क्षेत्रातील कंपन्या करत होत्या. अखेर एनपीपीएनं औषधांचे दर 10.7 टक्क्यांनी वाढवण्यास मंजुरी दिली. घाऊक महागाई दरात वाढ झाल्यानं औषधांच्या किमती वाढवाव्या लागत असल्याचं एनपीपीए सांगितलं आहे. 


पुढील महिन्यापासून म्हणजे एक एप्रिलपासून 800 अधिक आवश्यक औषधांच्या दरात 10 टक्क्यांनी वाढ होणार आहे. यामध्ये ताप, हृदयविकार, उच्च रक्तदाब, त्वचा रोग आणि अशक्तपणा यांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या औषधांचा समावेश आहे. याचाच परिणाम म्हणून पुढील महिन्यापासून पेन किलर आणि पॅरासिटामॉलसारख्या अँटीबायोटिक्स, फेनिटोइन सोडियम, मेट्रोनिडाझोल यांसारखी अत्यावश्यक औषधे महाग होणार आहे. 


औषधांच्या किंमती का वाढणार?


औषध निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच मनुष्यबळाची किंमत देखील वाढली आहे. अशा स्थितीमध्ये औषधांच्या निर्मितीचा खर्च वाढला आहे.  गेल्या दोन वर्षांत काही प्रमुख API च्या किंमती 15 ते 130 टक्क्यांनी वाढल्या आहेत. पॅरासिटेमॉलच्या किंमती 130 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याच वेळी, सिरप आणि द्रव औषध, (ड्राप) इतर अनेक औषधे आणि वैद्यकीय अनुप्रयोगांमध्ये वापरल्या जाणार्‍या ग्लिसरीनच्या किंमती 263 टक्के आणि पॉपीलीन ग्लायकोल 83 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. मध्यंतरीच्या किंमती 11 टक्क्यांवरून 175 टक्क्यांवर पोहोचल्या आहेत. 


 कोरोना महामारीपासून औषध उद्योग सातत्याने औषधांच्या किंमती वाढवण्याची मागणी करत होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हजारहून अधिक भारतीय औषध निर्मात्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या एका लॉबीने सरकारला सर्व विहित फॉर्म्युलेशनच्या किमतींमध्ये 10% वाढ करण्यास त्वरित परवानगी देण्याची विनंती केली होती. तसेच सर्व नॉन-शेड्यूल औषधांच्या किमतीत 20% वाढ करण्यास सांगितले होते. त्यामुळे सरकारने शेड्युल औषधांच्या किमतीत 10 टक्के वाढ करण्याची परवानगी दिली. मात्र याचा परिणाम हा प्रत्येक कुटुंबावर होईल याची शक्यता नाकारता येत नाही. 


संबंधित बातम्या :


Maharashtra Tea Price: सर्वसामान्यांच्या खिशाला चटका; कटिंग चहा महागला, चहाच्या किमतीत 2 रुपयांची वाढ