नवी दिल्ली: उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर आता पुन्हा एकदा कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर 8 जानेवारीला आचारसंहिता जारी करण्यात आली होती. त्यानंतर कोरोना लस सर्टिफिकेटवरुन पंतप्रधानांचा फोटो हटवण्यात आला होता. 


केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी आता पुन्हा एकदा या सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात यावा अशी इच्छा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्या दृष्टीने कोविन अॅपवर आवश्यक ते बदल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर कोविन अॅपला फिल्टर लावण्यात आलं होतं. त्यामुळे त्यावर पंतप्रधानांचा फोटो छापला जात नव्हता. 


पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 8 जानेवारीला लसीच्या सर्टिफिकेटवर पंतप्रधानांचा फोटो छापायचं बंद केलं होतं. पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर यावर पंतप्रधानांचा फोटो असण्याला अनेक पक्षांनी आक्षेप घेतला होता. त्यानुसार मग निवडणूक आयोगाने कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावू नये असा आदेश दिला होता. 


कोरोनाच्या सर्टिफिकेटवर पंतप्रधानांचा फोटो असण्याला या आधी तृणमूल कॉंग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांसह अनेक पक्षांनी आक्षेप घेतला होता. तृणमूलच्या ममता बँनर्जी यांनी तर यावर सडकून टीका केली होती. जगभरात कोणत्याही देशामध्ये कोरोनाच्या सर्टिफिकेटवर त्या देशाच्या प्रमुखांचा फोटो नाही मग भारतात का असाही सवाल त्यांनी विचारला होता. पंतप्रधानांचा फोटो आहे तर मग राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो का नसावा असंही त्या म्हणाल्या होता. 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पुन्हा एकदा पंतप्रधानांचा फोटो छापण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता विरोधी पक्षांची भूमिका काय असेल याची अनेकांना उत्सुकता लागली आहे. 


महत्वाच्या बातम्या :