दुधात महागाईचा खडा, राज्यात दूध संघाकडून प्रतिलीटर दोन रुपयांची दरवाढ
पेट्रोल, डिझेलनंतर गॅस या सगळ्याच गोष्टी महाग होत असताना राज्यातील नागरिकांना महागाईचा आणखी फटका बसला आहे. या सगळ्याबरोबरच आता दूध देखील महाग झाले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहानंद, चितळे, गोवर्धन, कात्रज दुधाच्या खरेदीत तीन रुपये तर विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
गाईच्या दूध खरेदी आणि विक्री दरात प्रतिलिटर प्रत्येकी तीन आणि दोन रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय राज्यातील सहकारी व खासगी दूध उत्पादक संघांकडून घेण्यात आला आहे.
ग्राहकांना प्रति लिटर दूधामागे आता दोन रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. शेतकऱ्यांकडून जे दूध संघ दूध खरेदी करतात त्या शेतकऱ्यांना तीन रुपये प्रतिलिटर वाढवून देण्यात येणार असल्याचा निर्णय एका बैठकीत घेण्यात आला आहे.
या नव्या निर्णयामुळे आता गाईच्या दुधाचा खरेदीदर प्रतिलिटर 33 रुपये तर, पिशवीबंद दुधाचा किरकोळ विक्री दर प्रतिलिटर 52 रुपये असणार आहे. 15 मार्चपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.
वीज, पॅकेजिंग, लॉजिस्टिक आणि चारा यांच्या वाढत्या किंमतीमुळे दरवाढ करण्यात आली आहे अशी माहिती कात्रज डेअरीचे कार्यकारी संचालक विवेक क्षीरसागर यांनी दिली.