Mann Ki Baat PM Modi Live :  आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देशाला संबोधित केलं. मन की बातच्या माध्यमातून त्यांनी आज विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी भारतानं स्टार्टअप्समध्ये केलेल्या कामगिरीचं कौतुक केलं. तसंच आगामी योग दिनाची थीम घोषित केली आणि योग दिन उत्साहात साजरा करण्याचं आवाहनही केलं. 


पंतप्रधानांच्या मन की बात मधील दहा महत्वाचे मुद्दे



  1. पुढील महिन्यात 21 जून रोजी आपण 8वा 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा करणार आहोत. या 'योग दिवसाची संकल्पना आहे - “मानवतेसाठी योग”. मी तुम्हा सर्वांना 'योग दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन करतो. तुम्हीही 'योग दिना'ची तयारी आत्तापासूनच सुरू करावी असे मला वाटते. अधिकाधिक लोकांना भेटा, सर्वांना 'योग दिना'च्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करा, प्रेरणा द्या. 


  2. आपण कुठेही गेलो तरी या तीर्थक्षेत्रांचा सन्मान राखला पाहिजे. तेथील शुचिता, स्वच्छता, पवित्र वातावरण हे आपण कधीही विसरता काम नये, ते जपले पाहिजे आणि म्हणूनच आपण स्वच्छतेचा संकल्प लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आपल्याकडे तीर्थयात्रा महत्वाची आहे, त्याचप्रमाणे तीर्थ सेवेचेही महत्त्व सांगितले आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की तीर्थ सेवेशिवाय तीर्थयात्राही अपूर्ण आहे.


  3. तुमच्या परिसरात कोणते महिला बचत गट कार्यरत आहेत ते शोधा. त्यांच्या उत्पादनांची माहिती देखील गोळा करा आणि शक्यतोवर या उत्पादनांचा वापर करा.  या उत्पादनांचा वापर केल्याने तुम्ही केवळ बचत गटाचे उत्पन्न वाढवण्यास हातभार लावणार नाही तर त्याबरोबर 'आत्मनिर्भर भारत मोहिमेला' चालनाही मिळेल.अशा दुकानांमुळे जीआय उत्पादनांच्या तसेच हस्तकला उत्पादनांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. या मोहिमेमुळे केवळ कारागिरांनाच चालना मिळाली नाही, तर महिलांचे उत्पन्न वाढून त्यांचे सक्षमीकरणही होत आहे.


  4. देशात स्टार्ट-अपसाठी संपूर्ण आधारभूत यंत्रणा तयार केली जाते आहे, ही आपल्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. आगामी काळात स्टार्ट-अप जगतात आपल्याला भारताच्या प्रगतीची नवीझेप पाहायला मिळेल, अशी खात्री मला वाटते.


  5. देशातील युनिकॉर्नची संख्या 100 वर पोहोचली आहे. एक युनिकॉर्न, म्हणजे किमान साडे सात हजार कोटींचा स्टार्टअप, हे तुम्हाला माहिती असेलच. या युनिकॉर्न्सचे एकूण मूल्य 330 अब्ज डॉलर्सपेक्षा म्हणजे 25 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. प्रत्येक भारतीयासाठी ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. आणखी एका गोष्टीचे तुम्हाला आश्चर्य वाटेल, ती म्हणजे आपल्या एकूण युनिकॉर्नपैकी 44 युनिकॉर्न गेल्या वर्षीच तयार झाले होते. इतकेच नाही तर या वर्षातील ३-४ महिन्यांत आणखी १४ नवीन युनिकॉर्न तयार झाले. 


  6. जागतिक साथरोगाच्या या काळातही आपले स्टार्ट-अप, संपत्ती आणि मूल्य निर्मिती करत राहिले आहेत. भारतीय युनिकॉर्नचा सरासरी वार्षिक वाढीचा दर #अमेरिका, #ब्रिटन आणि इतर अनेक देशांपेक्षा जास्त आहे.येत्या काही वर्षांत या संख्येत मोठी वाढ होईल, असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपले युनिकॉर्न वैविध्यपूर्ण आहेत


  7. भारताची स्टार्ट-अप यंत्रणा केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित नाही, तर लहाननगरांमधून आणि शहरांमधूनही उद्योजक उदयाला येत आहेत. ई-कॉमर्स, फिन-टेक, एड-टेक, बायो-टेक अशा अनेक क्षेत्रांत ते काम करत आहेत. मला अधिक महत्त्वाची वाटणारी आणखी एक गोष्ट म्हणजे स्टार्ट-अप्सचे जग नव भारताच्या भावना प्रतिबिंबित करणारे आहे. 


  8. या उन्हाळ्याच्या दिवसांत पशु-पक्ष्यांना अन्न-पाणी पुरवण्याचे आपले माणुसकीचे कर्तव्यदेखील आपल्याला निभवायचे आहे हे लक्षात ठेवा


  9. वेगवेगळ्या प्रदेशातील वैविध्यपूर्ण पेहराव, खाद्यपदार्थ आणि संस्कृती ही आपली ओळख आहे. ही विविधता, हे वैविध्य, एक राष्ट्र म्हणून आपल्याला अधिक समर्थ करते आणि आपल्यातील एकजूट कायम राखते. 


  10. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवात हाच आपला संकल्प असावा आणि हीच आपली साधना असावी आणि त्याचा  एकच मार्ग आहे - कर्तव्य, कर्तव्य आणि कर्तव्य.