PM Modi Live Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी भारतानं स्टार्टअप्समध्ये केलेल्या कामगिरीचं कौतुक केलं. त्यांनी म्हटलं की, काही दिवसांपूर्वीच आपल्या देशाने एक अशी कामगिरी केली आहे, जी आपल्या सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे. भारताच्या सामर्थ्याप्रती नवा आत्मविश्वास निर्माण करणारी अशी ही कामगिरी आहे. क्रिकेटच्या मैदानावर टीम इंडियाच्या कोणत्याही फलंदाजाने शतक फटकावल्याचे ऐकून तुम्हाला आनंद होत असेलच. यावेळी मात्र भारताने एका वेगळ्याच मैदानात शतक झळकावले, ते खूपच विशेष आहे. या महिन्याच्या 5 तारखेला देशातील युनिकॉर्नची संख्या 100 वर पोहोचली आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
युनिकॉर्न्सचे एकूण मूल्य 25 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त
पंतप्रधान म्हणाले की, एक युनिकॉर्न, म्हणजे किमान साडे सात हजार कोटींचा स्टार्टअप, हे तुम्हाला माहिती असेलच. या युनिकॉर्न्सचे एकूण मूल्य 330 अब्ज डॉलर्सपेक्षा म्हणजे 25 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. प्रत्येक भारतीयासाठी ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. आणखी एका गोष्टीचे तुम्हाला आश्चर्य वाटेल, ती म्हणजे आपल्या एकूण युनिकॉर्नपैकी 44 युनिकॉर्न गेल्या वर्षीच तयार झाले होते. इतकेच नाही तर या वर्षातील 3-4 महिन्यांत आणखी 14 नवीन युनिकॉर्न तयार झाले. जागतिक साथरोगाच्या या काळातही आपले स्टार्ट-अप, संपत्ती आणि मूल्य निर्मिती करत राहिले आहेत. भारतीय युनिकॉर्नचा सरासरी वार्षिक वाढीचा दर अमेरिका, ब्रिटन आणि इतर अनेक देशांपेक्षा जास्त आहे.येत्या काही वर्षांत या संख्येत मोठी वाढ होईल, असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपले युनिकॉर्न वैविध्यपूर्ण आहेत, असं पंतप्रधान म्हणाले.
भारताची स्टार्ट-अप यंत्रणा केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित नाही
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ई-कॉमर्स, फिन-टेक, एड-टेक, बायो-टेक अशा अनेक क्षेत्रांत ते काम करत आहेत. मला अधिक महत्त्वाची वाटणारी आणखी एक गोष्ट म्हणजे स्टार्टअप्सचे जग नव भारताच्या भावना प्रतिबिंबित करणारे आहे. आज, भारताची स्टार्ट-अप यंत्रणा केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित नाही, तर लहान नगरांमधून आणि शहरांमधूनही उद्योजक उदयाला येत आहेत. भारतात ज्याच्याकडे नाविन्यपूर्ण कल्पना आहे, तो संपत्ती निर्माण करू शकतो, हे यावरून दिसून येते.मित्रहो, देशाच्या या यशासाठी देशाची युवाशक्ती, देशातील प्रतिभा आणि देशाचे सरकार असे सर्व मिळून एकत्रित प्रयत्न करत आहेत, यात प्रत्येकाचे योगदान आहे, असं ते म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की, आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे, स्टार्ट-अप जगतात योग्य मार्गदर्शन खूपच महत्वाचे आहे. एक चांगला मार्गदर्शक स्टार्टअपला यशाच्या नव्या शिखरांवर नेऊ शकतो. योग्य निर्णय घेण्यासाठी तो संस्थापकांना योग्य मार्गदर्शन करू शकतो. भारतात असे अनेक मार्गदर्शक आहेत, ज्यांनी वाढत्या स्टार्ट-अप्ससाठी स्वतःला समर्पित केले आहे आणि याचा मला अभिमान वाटतो, असं ते म्हणाले. पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, देशात स्टार्ट-अपसाठी संपूर्ण आधारभूत यंत्रणा तयार केली जाते आहे, ही आपल्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. आगामी काळात स्टार्ट-अप जगतात आपल्याला भारताच्या प्रगतीची नवी झेप पाहायला मिळेल, अशी खात्री मला वाटते, असं ते म्हणाले.