PM Modi Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे जनतेला संबोधित केलं. यावेळी मोदींनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यामध्ये चंदीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर अनेक निर्णय घेण्यात आले.


पंतप्रधानांच्या मन की बात मधील 10 महत्वाचे मुद्दे : 


1. माझ्या प्रिय देशवासियांनो, आजपासून तीन दिवसांनंतर म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी अमृत महोत्सवातला एक विशेष दिवस येतो आहे. या दिवशी आपण, भारतमातेचे शूर सुपुत्र भगतसिंग यांची जयंती साजरी करणार आहोत. भगतसिंग यांच्या जयंतीपूर्वी त्यांना आदरांजली देण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. चंदीगड विमानतळाला आता शहीद भगतसिंग यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दीर्घ काळापासून या निर्णयाची प्रतीक्षा होती. या निर्णयाबद्दल मी चंदीगड, पंजाब, हरियाणा आणि देशातील सर्व जनतेचे अभिनंदन करतो. कर्तव्य पथावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारून देशाने असाच एक प्रयत्न केला आहे आणि आता चंदीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव देणे, हे या दिशेने उचललेले आणखी एक पाऊल आहे. 


2. चित्ता भारतात परतल्याबद्दल देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांनी आनंद व्यक्त केला आहे. 130 कोटी भारतीय खुश आहेत, त्यांना अभिमान वाटतो आहे. हे भारताचे निसर्गप्रेम आहे. मित्रहो, एक कृती दल तयार केले आहे. हे कृती दल चित्त्यांवर लक्ष ठेवणार असून ते इथल्या वातावरणात किती सहज रूळतात, हे पाहणार आहे. त्यानुसार काही महिन्यांनी निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला चित्ते बघता येतील. MyGov मंचावर एक स्पर्धा आयोजित केली जाईल. या स्पर्धेचा एक भाग म्हणून लोकांनी काही गोष्टी शेअर कराव्यात, असे आवाहन मी करतो. चित्त्यांसाठीच्या मोहिमेला काय नाव देता येईल? चित्यांना कोणत्या नावाने हाक मारता येईल, त्यांचे नामकरण करायचा विचारही आपण करू.


3. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज महान मानवतावादी, विचारवंत आणि देशाचे महान सुपुत्र दीनदयाल उपाध्यायजी यांचा जन्मदिवस. दीनदयाळजींनी आपल्या आयुष्यात जगातील मोठमोठ्या घडामोडी अनुभवल्या होत्या, हे त्यांच्या विचारांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य होय. अनेक वैचारिक संघर्षांचे ते साक्षीदार होते.


4. माझ्या प्रिय देशवासीयांनो, सध्या देशात सर्वत्र सणांचा उत्साह आहे. उद्या नवरात्रीचा पहिला दिवस आहे. या दिवशी आपण 'माँ शैलपुत्री' या देवीच्या पहिल्या रूपाची पूजा करणार. इथून पुढे नऊ दिवस नियम-संयम आणि उपवासाचे आणि नंतर विजयादशमीचा उत्सव देखील साजरा होणार. शिस्त आणि संयमाने सिद्धीची प्राप्ती आणि त्यानंतर विजयोत्सव, आपल्या आयुष्यात एखादे लक्ष्य साध्य करण्याचा हाच तर मार्ग आहे. दसऱ्या नंतर धनत्रयोदशी आणि दिवाळी हे सण देखील येणार आहेत.


5. 2 ऑक्टोबर ला येणाऱ्या गांधी जयंतीचे औचित्य साधत खादी, हातमाग, हस्तकला या सर्व उत्पादनांसोबत स्थानिक वस्तू देखील नक्की विकत घ्या.  स्थानिक उत्पादनांशी निगडित लोकांना आपण पाठबळ दिले पाहिजे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान आपण आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट देखील साध्य करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे यावेळी हे अभियान अधिक विशेष आहे.


6. मित्रांनो, मागील काही वर्षांपासून आपल्या देशामध्ये सणांसोबत एक नवीन संकल्प देखील आपण घेतला आहे. तुम्हां सर्वांना माहीतच आहे, हा संकल्प आहे - 'व्होकल फॉर लोकल'. आपल्या इथे तागाच्या, सुती, केळीच्या झाडापासून तयार केलेल्या अशा पारंपरिक पिशव्यांचा वापर पुन्हा एकदा वृद्धिंगत होत आहे. सणाच्या निमित्ताने याला प्रोत्साहन देणे ही आपली जबाबदारी आहे.


7. सांकेतिक भाषा दिनानिमित्त अनेक शालेय अभ्यासक्रमही सांकेतिक भाषेत सुरू करण्यात आले आहेत. मानकांनुसार सांकेतिक भाषेचा दर्जा कायम राखण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही बराच भर देण्यात आला आहे. भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र या संस्थेने आतापर्यंत दहा हजार शब्द आणि हावभावांचा शब्दकोश तयार केला आहे, याचा मला मनापासून आनंद वाटतो.


8. क्षयरोयमुक्त भारत अभियानाचा हा एक भाग आहे ज्याचा मुख्य आधार हा लोकसहभाग आणि कर्तव्य भावना आहे. योग्य सकस आहार, वेळेवर औषधांनीच क्षयरोगाचे उपचार शक्य आहेत. लोकसहभागाच्या या ताकदीमुळे वर्ष 2025 पर्यंत भारत नक्कीच क्षयरोग मुक्त होईल असा माझा विश्वास आहे. 


9. सर्व जगाने मान्य केले आहे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग खूपच फायदेशीर आहे, विशेषतः मधुमेह आणि रक्तदाबाशी निगडित समस्या सोडवण्यात योगची खूपच मदत होते. योगची हीच ताकद लक्षात घेत संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले. संयुक्त राष्ट्रसंघाने भारताच्या अजून एका प्रयत्नाला अधोरेखित करून त्याला सन्मानित केले आहे; तो प्रयत्न आहे 'भारतातील उच्चरक्तदाब नियंत्रण उपक्रम'. या उपक्रमा अंतर्गत रक्तदाब पीडित रुग्णांवर सरकारी सेवा केंद्रांमध्ये उपचार केले जातात.


10. एक मोठ्या बदलाचा संकेत आहे. लोकांचा उत्साह पाहता, आपल्याला एक ई-बुक तयार केली पाहिजे असे मला वाटते. ज्यामध्ये लोकं भरड धान्यांपासून बनणारे पदार्थ आणि आपले अनुभव लिहू शकतील.