Rajasthan Politics : मुख्यमंत्री पदाच्या दाव्यावरुन गेल्या अनेक दिवसांपासून राजस्थान काँग्रेसमध्ये (Rajasthan Congress) अंतर्गत कलह आहे. काही वेळेस हा कलह समोर देखील आला आहे. अशातच आता मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांचा बालेकिल्ला असलेल्या जोधपूर शहरात  सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या समर्थनार्थ पोस्टर लावण्यात आले आहे. आता जोधपूर शहरातही पोस्टर वॉर सुरु झालं आहे. सत्यमेव जयते 'नव्या युगाची सुरुवात' असे त्या पोस्टर लिहलं आहे. त्यामुळं राजकीय चर्चांना तोंड फुटलं आहे. माजी नगरसेवक राजेश मेहता यांनी ही पोस्टरबाजी केली आहे.


अशोक गेहलोत राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडणार


दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.  त्यामुळं आता राजस्थानचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार यावरुन चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचे सध्या दिल्ली ते जयपूर असे दौरे सुरु आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे त्यांच्या समर्नाचे मुख्यमंत्री करण्यासाठी दिल्लीत लॉबिंग करत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. त्याचवेळी सचिन पायलट यांचे समर्थक पायलट यांना मुख्यमंत्री करण्यासाठी वातावरण निर्मिती करत असल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याच्या घोषणेसोबतच अशोक गेहलोत यांनी आपण राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एक व्यक्ती एक पद यानुसार मी राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडणार असल्याचे गेहलोत यांनी स्पष्ट केलं आहे. पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याबाबतचा निर्णय सोनिया गांधी आणि प्रदेश प्रभारी ठरवतील असेही ते म्हणाले.




आज जयपूरमध्ये काँग्रेसची बैठक, पुढचा मुख्यमंत्री कोण यावर निर्णय होणार


दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जोधपूर शहरात सचिन पायलट यांच्या समर्थनार्थ पोस्टर लागल्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे. एकीकडे सचिन पायलट यांच्या समर्थनार्थ त्यांचे समर्थक 'नव्या युगाची सुरुवात' झाल्याचा प्रचार करत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे समर्थकही गेहलोत यांच्या गांधीवादी आणि विकासकामांबाबत सोशल मीडियावर प्रचार करत आहेत. दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्या जागी नवीन मुख्यमंत्री कोण असणार यावर याबाबत निर्णय घेण्यासाठी आज सायंकाळी 7 वाजता जयपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. यासाठी राज्यसभा खासदार मल्लिकार्जुन खरगे आणि प्रभारी महासचिव अजय माकन यांना निरीक्षक बनवण्यात आले आहे.


महत्त्वाच्या बातम्या: