Rahul Gandhi: मणिपूरमध्ये (Manipur) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा ताफा अडवल्यानंतर ट्वीट करत राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर काँग्रसेचे (Congres) नेते राहुल गांधी हे आज मणिपूरच्या दौऱ्यावर आहेत. परंतु मणिपूर पोलिसांकडून राहुल गांधी यांचा ताफा मणिपूरमधील बिष्णुपूरजवळ अडवण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले की, 'मी माझ्या मणिपूरच्या सर्व बंधू-भगिनींचे म्हणणे ऐकण्यासाठी आलो आहे. सर्व समाजतील लोकं इथे खूप प्रेमाने स्वागत करत आहेत. पण इथले सरकार मला अडवत आहे हे खूप दुर्दैवी आहे.'
मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, 'सध्या मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करणे हे एकमेव प्राथमिक ध्येय असायला हवं'. राहुल गांधी यांनी यावेळी चुरचंदपूर येथील एका शिबिरात जाऊन तिथल्या लोकांची भेट देखील घेतली. त्यांनी तिथल्या लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या. या शिबिरादरम्यान त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत दुपारचे जेवण देखील केले.
सध्य राहुल गांधी हे मणिपूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मणिपूरमध्ये होत असलेल्या हिंसाचाराची पाहणी करणार आहेत. तर या वेळी त्यांनी काही मदत शिबिरांना देखील भेट दिली. परंतु पोलिसांनी त्यांचा ताफा अडवल्याने काँग्रेसकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. मणिपूरचे काँग्रेसचे अध्यक्ष किशम मेघचंद्र यांनी म्हटलं की, 'प्रशासनाने राहुल गांधी यांना परवानगी नाकारल्याने त्यांचा मोइरंग हा दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यांना कोणत्याच मार्गाने मेईरंग पर्यंत जाता आले नाही. त्यांनी चुराचांदपूर येथेच थांबून लोकांशी संवाद साधला. तसेच ते आता इम्फाळला परत जात असून रात्री येथेच विश्रांती करतील.'
यावर काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'राहुल गांधींना अभिवादन करण्यासाठी लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे आहेत. परंतु तरीही आम्हाला समजत नाही की त्यांनी आम्हाला का रोखले?' राहुल गांधी यांना सुरक्षेचे कारण देऊन त्यांना पुढे जाण्यापासून पोलिसांनी रोखलं. परंतु काँग्रेसकडून मात्र मणिपूर पोलिसांच्या या भूमिकेवर संताप व्यक्त करण्यात येत आहे.