Rahul Gandhis Convoy Stopped : हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या (Manipur) दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना स्थानिक पोलिसांनी पुढे जाण्यापासून रोखलं. राहुल गांधी यांना इम्फाळ (Imphal) विमानतळासमोरील बिष्णुपूर चेकपोस्टवर थांबवण्यात आलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव राहुल गांधींचा ताफा थांबवण्यात आला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी आज 29 जून रोजी मणिपूरमध्ये पोहोचले. इथून इम्फाळला जात असताना वाटेत पोलिसांनी त्यांचा ताफा अडवला. इम्फाळपासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या विष्णुपूर जिल्ह्यात राहुल गांधी यांचा ताफा थांबवण्यात आला आहे. परिसरातील हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यापासून रोखलं.
केसी वेणुगोपाल काय म्हणाले?
दरम्यान, "राहुल गांधी यांचा ताफा पोलिसांनी बिष्णुपूरजवळ रोखला आहे. आम्ही तुम्हाला परवानगी देऊ शकत नाही, असं पोलिसांनी आम्हाला सांगितलं. राहुल गांधींना अभिवादन करण्यासाठी लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे आहेत. आम्हाला समजत नाही की त्यांनी आम्हाला का रोखले?," असं काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितलं.
राहुल गांधी यांचा दोन दिवसीय मणिपूर दौरा
तर एएनआयच्या वृत्तानुसार, राहुल गांधी दोन दिवसीय मणिपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते राज्यातील हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी करतील. शिवाय या दौऱ्यात राहुल गांधी मदत शिबिरांनाही भेट देणार आहेत. यासोबतच त्यांचा इम्फाळ आणि चुरचंदपूर इथल्या नागरी समाजाच्या प्रतिनिधींना भेटण्याचा कार्यक्रम आहे.
राहुल गांधींच्या दौऱ्याची माहिती देताना काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर लिहिले आहे की, तुमचे राहुल गांधी प्रेम, बंधुता आणि शांतीचा संदेश घेऊन मणिपूरला पोहोचले आहेत. काही वेळात ते हिंसाचार पीडितांना भेटतील.
हेही वाचा
Rahul Gandhi In karolbagh : राहुल गांधींकडून बाईकची सर्व्हिस...राहुल गांधींचा अनोखा अंदाज!