Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) भाजपविरोधात (BJP) देशातील तब्बल 15 विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. बिहारमधील (Bihar) पाटणा येथे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या अध्यक्षतेखाली 23 जून रोजी विरोधी पक्षांची बैठक झाली. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge), माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. पण बैठकीनंतर अवघ्या काही दिवसांतच केजरीवालांनी लोकसभा निवडणुकांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


आम आदमी पार्टीनं (AAP) बुधवारी (28 जून) सांगितलं की, ते दिल्लीतील सर्वच्या सर्व सात लोकसभा जागांवर एकटेच निवडणूक लढणार आहोत.


काँग्रेसबद्दल काय म्हणाले?


पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, आपचे नेते संदीप पाठक यांनी दिल्ली आणि हरियाणाच्या नेत्यांची भेट घेतल्यानंतर सांगितलं की, भाजपच्या विरोधात विरोधी एकजुटीची गरज आहे, परंतु ते काँग्रेसच्या वृत्तीवर अवलंबून आहे. खरंतर, पाटणा येथे विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर 'आप'नं एक निवेदन जारी केलं होतं की, जर काँग्रेसनं दिल्ली अध्यादेशाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाही, तर आम्ही अशा कोणत्याही बैठकीत सहभागी होणार नाही, ज्यामध्ये काँग्रेस सहभागी असेल.


अध्यादेशावर काँग्रेस काय म्हणाली?


विरोधी पक्षांच्या बैठकीपूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले होते की, अध्यादेशावर निर्णय सभागृहात घेतला जातो. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी बैठक घेतली जाते. एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार, खर्गे यांनी बैठकीतही याच गोष्टीचा पुनरुच्चार केला.


विरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहणार का?


मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आयोजित केलेल्या बैठकीनंतर विरोधी पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले होते की, पुढील रणनीतीबाबत विरोधी पक्ष 10 ते 12 जुलै दरम्यान शिमला, हिमाचल प्रदेश येथे एक दिवसीय बैठक घेणार आहेत. यावर आप नेते संदीप पाठक म्हणाले की, बैठकीला उपस्थित राहायचं की नाही? याचा निर्णय आपचे संयोजक अरविंद केजरीवाल घेतील.


आपकडून समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावर मोदी सरकारला पाठिंबा


समान नागरी कायदा (Uniform Civil Code) लागू करण्याबाबत चर्चा सुरु असतानाच मोदी सरकारला या मुद्द्यावर आम आदमी पक्षाचा पाठिंबा मिळत असल्याचं दिसत आहे. आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) समान नागरी कायद्याचं तत्वत: समर्थन केलं आहे. सर्व धर्मांशी चर्चा करुन सहमतीनेच हा कायदा करण्यात यावा, असं आम आदमी पक्षाचे सरचिटणीस संदीप पाठक म्हणाले. समान नागरी कायद्याचं आम्ही तत्वतः समर्थन करतो, हा कायदा असावा असं घटनेच्या कलम 44 मध्ये देखील लिहिलं आहे. मात्र सर्व धर्मियांची याला संमती हवी. या मुद्द्यावर सर्व धर्म आणि राजकीय पक्षांशी चर्चा झाली पाहिजे. सर्वांच्या संमतीनंतरच त्याची अंमलबजावणी व्हायला हवी, अशी आपची भूमिका आहे, असं संदीप पाठक यांनी म्हटलं.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


AAP Supports UCC : समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावर मोदी सरकारला मोठा पाठिंबा, आम आदमी पक्षाकडून तत्वत: समर्थन, पण...