नवी दिल्ली : एकीकडे काँग्रेस अध्यक्षपदावर राहुल गांधींच्या पुनरागमनासाठी काँग्रेस उत्सुक असताना दुसरीकडे संजय राऊत यूपीए अध्यक्षपदासाठी शरद पवार यांच्या नावाची मागणी सातत्यानं पुढे आणत आहेत. आज संजय राऊतांनी पुन्हा एकदा याबाबत वक्त्व्य केल्यानंतर त्यावर काँग्रेसच्या गोटातून देखील जोरदार प्रतिक्रिया आल्या आहेत


 शरद पवार यांना यूपीएचं अध्यक्ष करण्यात यावं यासाठी सतत बॅटिंग करणाऱ्या संजय राऊत यांनी आज पुन्हा ही मागणी केली आहे. शरद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष... संजय राऊत हे शिवसेनेचे खासदार आणि यूपीएचं नेतृत्व काँग्रेस करत आली आहे अशा अजब त्रिकोणात संजय राऊत मात्र सातत्यानं याबाबत  वक्तव्य करत आहेत. आज त्यांच्या मागणीला संदर्भ होता सोनिया गांधी आणि सुप्रिया सुळे यांच्यात झालेली फोनवरुन चर्चेचा. 


काँग्रेसमध्ये पवारांच्या नावावरुन नाराजी नाही. उलट काँग्रेसचे काही लोकच अशी इच्छा व्यक्त करतात.  यूपीए बळकट व्हायला हवी अशी त्यांचीही इच्छा आहे असं राऊत म्हणाले .पण त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, संजय राऊतांनी आता या विषयावर बोलणं बंद करावं. 


यूपीए आणि एनडीए या दोन आघाड्या देशात एकेकाळी भक्कम होत्या. पण सध्या या दोन्ही आघाडी अस्तित्वहीन झाल्या आहेत. भाजप एकट्याच्या बळावर मजबूत झाल्यानं एनडीएची किंमत उरली नाही. शिवसेना, अकाली दल एनडीएतून बाहेर पडले आहेत तर दुसरीकडे यूपीएत काँग्रेसला राष्ट्रवादी, डीएमके वगळता भक्कम साथीदार मिळत नाही. शिवसेना एनडीएतून बाहेर पडली आहे पण अजूनही अधिकृतपणे यूपीएत आलेली नाही.


 शिवसेना महाराष्ट्रात काँग्रेससोबत सत्तेत आहे. पण अनेक राष्ट्रीय मुद्दयांवर शिवसेनेची काँग्रेसला साथ देताना गोची झाली होती. संसदेत नागरिकत्व विधेयकावर, शेतकरी कायद्यांवर काँग्रेसच्या बाजूनं उभं राहताना शिवसेनेचा संभ्रम झाला होता. त्यामुळे थेट यूपीएचा घटक बनणं शिवसेनेला तरी परवडणार का हा प्रश्नच आहे. 


 यूपीएचं अध्यक्षपद पवारांनी स्वीकारावं असं संजय राऊत जेव्हा जेव्हा म्हणतात तेव्हा तेव्हा एकप्रकारे राहुल गांधींच्या अपयशाची चर्चा सुरु होते. कारण काँग्रेस अध्यक्षच यूपीएचं अध्यक्षपद स्वीकारत आले आहेत. एकीकडे राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपद तातडीनं स्वीकारावं यासाठी काँग्रेसजन प्रयत्न करत असताना संजय राऊतांच्या या  वक्तव्यामुळे राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय का हाही प्रश्न आहे. 


संबंधित बातम्या :