मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे नेहमीच भाजप आणि विरोधी पक्षावर आपल्या खास शैलीत टीका करत असतात. आज त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका करत नरेंद्र मोदींपेक्षा फडणवीस मोठे असल्याचं म्हटलं आहे. विरोधी पक्षनेते फडणवीस हे मोदींपेक्षा मोठे नेते असावेत, त्यामुळे त्यांना हे सांगण्याचा अधिकार आहे. त्यांची उंची सह्याद्रीपेक्षा मोठी आहे, त्यामुळे ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत आणि विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही नीट सांभाळू शकले नाहीत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. 


संजय राऊत म्हणाले की, परमबीर सिंह यांनी खरंच ते पत्र लिहिलं आहे का? असा प्रश्न निर्माण होतो की त्यांना कोणीतरी लिहून दिलं आणि त्यांनी सही केली. ते म्हणाले की, चौकशीला कोणाचाही नकार नव्हता. मुख्यमंत्री, अनिल देशमुख, आम्ही चौकशी करा म्हणत होतो, फक्त विरोधी पक्षनेते म्हणतात चौकशी नको आधी फाशी द्या.चौकशीआधी फाशी त्यांच्या राजवटीत किती लोकांना दिली हा तपशील त्यांनी जाहीर केला पाहिजे. 


संजय राऊत म्हणाले की, विरोधी विरोधी पक्षनेत्यांनी त्या पदाची प्रतिष्ठा नष्ट होईल, कमी होईल असं वर्तन करु नये. शेवटी देशातील शोषित, पीडितांचा आवाज विरोधी पक्षनेता असतो, सरकार नसतं याचं भान प्रत्येत विरोधी पक्षनेत्याने ठेवलं पाहिजे, असंही ते म्हणाले.  वारंवार राजीनाम्याची आणि सरकार बरखास्त करण्याची मागणी यामुळे विरोधी पक्षाचं हसू होतं, लोक त्यांना मूर्खात काढतात हे समजलं पाहिजे. आमच्यासाठी हा विषय संपला असून यावर आता जास्त चर्चा होता कामा नये. यामध्ये विशेष घडामोडी घडतील असं वाटत नाही, असं राऊत म्हणाले.  


राज्यपालांना पीएचडी करायची आहे का?
यावेळी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या निवडीवरुन राज्यपालांवर खोचक टीका करताना संजय राऊत म्हणाले की, राज्यपाल सध्या खूप व्यस्त आहेत. त्यांना सत्ताधाऱ्यांना भेटण्यासाठी वेळ नाही.  राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी पाठवून सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला. त्याबद्दल काय झालं हे कळणं गरजेचं आहे. अभ्यास करत आहेत वगैरे ठीक आहे, त्यातून त्यांना काही पीएचडी करायची आहे का? कॅबिनेटनं घटनात्मक दृष्ट्या जी नावं पाठवली आहेत ती जास्तीत जास्त काळ आपल्या मांडीखाली कशी दाबून ठेवता येतील यासंदर्भात एखादा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड करायचा आहे का असा प्रश्न आहे, असं राऊत म्हणाले. 


राऊत म्हणाले की, विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते सतत राज्यपालांना भेटत असतात. त्यांनी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीविषयी राज्यपालांना विचारायला हवं.