नवी दिल्ली : परमबीर सिंह यांचे गृहमंत्र्यावरील आरोप, सचिन वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारवर अनेक आरोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यात काल चर्चां झाली आहे. स्वतः सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. 


महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस एक घटक पक्ष आहे. विरोधकांनी सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर आरोप केले आहेत. असं असताना काँग्रेसची नेमकी भूमिका काय? असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात होता. महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या सर्व नेत्यांची बैठक घेतली. ज्यात एका गटाचे म्हणणे होते की आपण मित्र पक्षाबरोबर उभे राहिले पाहिजे, त्यांना सहकार्य केले पाहिजे. पण एका गटाचे म्हणणे होते की या आरोपांमुळे काँग्रेसचे नुकसान होत आहे. असे मतभेद असताना सुप्रिया सुळे आणि सोनिया गांधी यांच्यात झालेली चर्चा महत्वाची ठरते.


महाविकास आघाडीचे नेते आणि राज्यपालांची भेट टळली, राज्यपाल 28 मार्चपर्यंत देहरादूनच्या दौऱ्यावर






Phone Tapping | रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग करताना गृहसचिवांची परवानगी घेतलीच नव्हती- जितेंद्र आव्हाड


काँग्रेस पक्षश्रेष्ठींना राज्यातील राजकीय परिस्थितीत होणारे आरोप आणि यावर राष्ट्रवादीची भूमिका याबाबत सुप्रिया सुळे यांनी माहिती दिल्याचे समजते. महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये समन्वय असणे आता आवश्यक आहे. विरोधकांनी आरोप केले आणि सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सत्ताधारी करत असताना तिन्ही पक्षातील संवाद महत्वाचा आहे. म्हणून सोनिया गांधी आणि सुप्रिया सुळे यांच्यात राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची शक्यता आहे.


सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्वीटमध्ये सोनिया गांधी यांनी मार्गदर्शन केले याबाबत आभारही व्यक्त केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणावर या दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याचे चित्र आहे. राज्यातील राजकीय घडामोडींनंतर तिन्ही पक्षांनी आता एकत्र येऊन आक्रमक भूमिका घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे तिन्ही पक्ष एकत्र आहेत त्यांच्यात मतभेद नाही हेच यातून स्पष्ट होत आहे.