नवी दिल्ली : कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी दिलासा देणारी  बातमी आहे. कोरोनावरील उपचारात प्रभावी ठरलेल्या  रेमडेसिवीर या औषधाच्या किमतीत कमालीची घट झाली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन आता फक्त 900 रुपयांना मिळणार आहे. रेमडेसिवीरची किंमत 2800 रुपये होती. 


रेमडेसिवीर बनवणाऱ्या झायडस कॅडिला या कंपनीने औषधाची किंमत 70 टक्क्यांनी कमी केली आहे.  हेच इंजेक्शन मायलन या बंगळूरु येथील कंपीनीकडून सरकारला 600 रुपयांमध्ये देण्यात येणार आहे.  गेल्या वर्षी राज्यात या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार झाला होता. याच काळात लोकांनी मूळ किंमतीपेक्षा अधिकचे पैसे मोजून हे इंजेक्शन खरेदी केले होते. त्यामुळे या इंजेक्शनची किंमत कमी करावी, अशी मागणी जोर धरू लागली होती.


एकीकडे कोरोनाच्या औषधांमध्ये मोठी नफेखोरी आणि काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी येत असतांना  या निर्णयामुळे हजारो रुग्णांचे जीव वाचणार आहेत. तसेच  कोरोनाविरुद्धची लढाई आणखी सक्षमपणे लढता येईल.


 कोरोनाबाधितांमध्ये नव्यानं होणारी वाढ ही आता चिंता वाढवत असल्याचं स्पष्ट होऊ लागलं आहे. बुधवारी सायंकाळी प्रशासनानं दिलेल्या अधिकृत माहितीनुसार एकट्या मुंबईत 24 तासांमध्ये तब्बल 5185 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, सहाजणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.


सर्वाधिक रुग्णसंख्या असलेले देशातील 10 पैकी 9 जिल्हे महाराष्ट्रात



  • पुण्यात सर्वाधिक 43,590 रुग्ण

  • नागपूर 33,160

  • मुंबई 26,599

  • ठाणे 22,513

  • नाशिक 15,710

  • औरंगाबाद 15,380

  • (बंगळुरु शहर 10,786) 

  • नांदेड 10,106

  • जळगाव 6087

  • अकोला 5704