Arjun Khotkar ED Case : सलग दुसऱ्या दिवशी भाजप खासदार रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची भेट घेतल्यानंतर आणि शिंदे गटात सामील होण्याचे संकेत देताना, अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. संकटाच्या काळात कुणीही स्वतःला सेफ करण्याचा प्रयत्न करतो. कुटुंबाचे आणि बाकीचे अनेक तणाव असतात, असे उद्गार अर्जुन खोतकर यांनी काढले. त्यामुळे संकटाची चाहूल लागलेले अर्जुन खोतकर वेगळं पाऊल उचलणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. जालन्यात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर पुढचा निर्णय जाहीर करेन, असं अर्जुन खोतकर 'एबीपी माझा'शी बोलताना म्हणाले.


काय आहे अर्जुन खोतकर यांचं ईडी प्रकरण?


- भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जालन्यातील रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर 100 कोटी घोटाळ्याचा गंभीर आरोप केला होता. 
- सोमय्यां यांच्या आरोपांनंतर 26 नोव्हेंबर 2021 रोजी ईडीचं एक पथक अर्जुन खोतकर यांच्या घरी दाखल झालं.
- ईडीच्या अधिकाऱ्यांनी रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी अर्जुन खोतकर यांची सलग 12 तास कसून चौकशी केली होती.
- पण 12 तासांच्या चौकशीनंतरही ईडीच्या अधिकाऱ्यांचं समाधान झालं नाही. 
- त्यामुळे त्यांनी पुन्हा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत छापा टाकत कागदपत्रांची पडताळणी केली.
- या व्यवहारात सहभागी असलेल्या औरंगाबादमधील दोन व्यापाऱ्यांचा कार्यालयावर ईडीने छापेमारी केली.
- ईडीकडून ज्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली, तो जालना सहकारी साखर कारखाना मे.अर्जुन शुगर इंडस्ट्रीज या कंपनीच्या मालकीचा आहे. 
- या कारखान्याच्या लिलावात आणि विक्रीच्या वेळी कायद्यातील तरतुदींचा भंग झाल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला.
- थकलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी या कारखान्याचा लिलाव करण्यात आला होता. 
- हा कारखाना अवघ्या 42 कोटी 31 लाख रुपयांना विकण्यात आला. 
- मात्र त्यानंतर ईडीने स्वतंत्रपणे या मालमत्तेचे सर्वेक्षण केल्यानंतर या कारखान्याच्या मालमत्तेची एकूण किंमत 78 कोटींपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले.
- आता या प्रकरणात ईडीकडून अर्जुन खोतकर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या