Maharashtra Karnataka Border Dispute : सीमावादावर अमित शाहांच्या भेटीपूर्वी दिल्लीत महाराष्ट्राच्या बेकीचे दर्शन; ठाकरे गटाच्या विरोधाने धैर्यशील माने, श्रीरंग बारणे माघारी परतले
Maharashtra Karnataka Border Dispute : कर्नाटकच्या दंडेलशाहीविरोधात महाराष्ट्रात एकीचा सूर उमटत असताना राजधानी दिल्लीत मात्र आज बेकीचे दर्शन झाले. ठाकरे गटाचा आणि शिंदे गटाचा वाद प्रकर्षाने दिसून आला.
Maharashtra Karnataka Border Dispute : कर्नाटकच्या दंडेलशाहीविरोधात महाराष्ट्रात एकीचा सूर उमटत असताना राजधानी दिल्लीत मात्र आज बेकीचे दर्शन झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची महाविकास आघाडीच्या खासदारांनी भेट घेतली. (Maharashtra Karnataka Border Dispute) मात्र, या भेटीपूर्वी ठाकरे गटाचा आणि शिंदे गटातील वाद प्रकर्षाने दिसून आला. त्यामुळे महाराष्ट्राच्या बेकीचेच दर्शन यावेळी झाले. खासदार धैर्यशील माने आणि श्रीरंग बारणे यांना ठाकरे गटाच्या खासदारांनी विरोध केल्याने दालनातून माघारी परतावे लागले. धैर्यशील माने राज्य सरकारकडून नेमण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्षही आहेत.
दरम्यान, सीमावादावर महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज भेट झाली. काल ही बैठक रद्द करण्यात आली होती. या भेटीनंतर अमित शाहांनी सीमावादावरून दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एकत्रित चर्चा घडवून आणू असं आश्वासन गृहमंत्र्यांनी दिल्याचा दावा खासदारांनी केला.
सुप्रिया सुळेंकडून पुढाकार मात्र, ठाकरे गटाने पाणी फेरले
अमित शाहांची भेट घेत असताना संवेदनशील मुद्दा असल्याने सीमावादावर महाराष्ट्राची एकी दिसावी यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी पुढाकार घेतला.त्यांनी भेटीला जात असताना सभागृहात उपस्थित असलेल्या शिंदे गटाच्या दोन खासदारांनाही सोबत येण्याचं आवाहन केले, पण ठाकरे गटाच्या खासदारांनी आक्षेप घेतल्यानं त्यांना गृहमंत्र्यांच्या दालनाबाहेरूनच परत फिरावं लागलं.
सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटाच्या खासदारांना तुम्हीही सोबत चला असं म्हटलं त्यावेळी खासदार धैर्यशील माने आणि श्रीरंग बारणे होते. ते दोघेही त्यांच्यासोबत यायला तयार झाले, पण जेव्हा ते अमित शाहांच्या दालनापाशी पोहचले, त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांनी त्यांना पाहून आक्षेप घेतला. हे येत असतील तर आम्ही सोबत येणार नाही असं म्हटल्यानं या दोन खासदारांना तिथूनच परत जावं लागलं.
ठाकरे गटाकडून भूमिका स्पष्ट
अर्थात बेकीच्या दर्शनानंतर शिवेसना ठाकरे गटाकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली गेले दोन दिवस आम्ही या मुद्यावर आवाज उठवत असताना हे खासदार गप्प का होते. आमच्यासोबत का नाहीत आले? तेव्हा एकी कुठे गेली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, पहिल्या दिवशी सुप्रिया सुळे आणि विनायक राऊत सभागृहात या मुद्द्यावर आवाज उठवत असताना सभागृहात उपस्थित असलेले शिंदे गटाचे खासदार मात्र गप्प होते.
भाजप राज्यसभा खासदारांच्या बैठकीत सीमावादाचा उल्लेख नाहीच
दुसरीकडे, आज पंतप्रधानांसोबत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेशच्या भाजप राज्यसभा खासदारांची बैठक झाली, पण त्यामध्ये कोणीही सीमावादाचा उल्लेख केला नाही. सीमावादाच्या विषयावर संपूर्ण राज्याची एकी दिल्लीमध्ये दिसली असती, तर ती चांगलीच ठरली असती. मात्र,जेव्हा सभागृहात हा विषय गाजत असताना तेव्हाही दिसली नाही आणि अमित शाहांच्या भेटीला जातानाही दिसली नाही. दोन्ही गट अमित शाहांच्या भेटीसाठी स्वतंत्रपणे प्रयत्न करत होते. आता यातून नेमकं काय साध्य होतं आणि केंद्राची पावलं किती वेगानं पडतात हे पाहावं लागेल.
इतर महत्वाच्या बातम्या