नवी दिल्ली : देशातील वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसने दिल्लीत 12 डिसेंबरला एका मेळाव्याचं आयोजन केलं होतं. पण काँग्रेसच्या या 'महागाई हटाव' मेळाव्याला दिलेली परवानगी केंद्र सरकारने अचानक नाकारली आहे. या गोष्टीचा काँग्रेसने निषेध केला असून आता हा मेळावा राजस्थानमधील जयपूर या ठिकाणी होणार आहे.
देशातील वाढत्या महागाईच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून त्यांनी 12 डिसेंबरला दिल्लीतल्या द्वारका येथे एका मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्याला काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित राहणार होते. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महागाई विरोधातील काँग्रेसच्या या सर्वात मोठ्या मेळाव्याला मिळालेली परवानगी अचानक रद्द करण्यात आली आहे.
मोदी सरकारने दबाव टाकून दिल्लीच्या नायब राज्यपालांकडून ही परवानगी रद्द करून घेतल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. आता दिल्ली ऐवजी राजस्थान मधल्या जयपूरमध्ये 'महागाई हटाव' हा मेळावा होणार आहे.
मोदी सरकार लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा आरोप करत काँग्रेसने म्हटलं आहे की, या अशा गोष्टींमुळे काँग्रेस विचलित होणार नाही किंवा सामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्याचं बंद करणार नाही.
संबंधित बातम्या :
- Mamata Banerjee : कोणती यूपीए? आता यूपीए उरली नाही; शरद पवारांच्या भेटीनंतर ममतांचा काँग्रेसला 'कात्रजचा घाट'
- Mamata Banergee : काँग्रेसला वगळून आघाडी करणार, जे लढतील त्यांना सोबत घेणार; ममता बॅनर्जींचे संकेत
- भाजपविरोधी लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढली पाहिजे; नाना पटोलेंचे ममता बँनर्जींना उत्तर