मुंबई : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएच्या व्यतिरिक्त वेगळा पर्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असून जे लढतील त्या सर्वांना सोबत घेतलं जाईल असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय. ममता बॅनर्जींनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर त्या बोलत होत्या.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "फॅसिस्टवादाच्या विरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे. सध्याच्या सत्तेविरोधात पर्यायी व्यवस्था उभी राहणं अत्यावश्यक आहे. भाजप विरोधात जे लढतील त्या सर्वांना एकत्र घेणार असून यूपीए व्यतिरिक्त वेगळा पर्याय देणार आहे."
समविचारी पक्षांनी एकत्र यावं, शरद पवारांचे आवाहन
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, "पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचं जुनं नातं आहे. सध्याचं राजकारण पाहता नेता रस्त्यावर राहिला तरच विजयी होऊ शकतो असं ममता बॅनर्जींशी चर्चा सुरु असताना लक्षात आलं. त्यामुळे येत्या काळात समविचारी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे."
ममता बॅनर्जी टीएमसीचा राष्ट्रीय पातळीवर विस्तार करण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे त्या काही दिवसांपासून त्या देशभरातील राज्यांचा दौरा करत आहेत. तसेच अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मुंबई दौऱ्यावर असताना काल (मंगळवारी) ममता बॅनर्जी यांनी सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तर आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली.
मुंबई भेटीत ममता बॅनर्जी काही उद्योगपतींच्यांही भेटी घेणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये व्यवसाय वाढीसाठी ही भेट असल्याचे बोललं जात आहे. सूत्रांच्या वृत्तानुसार, ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राजस्थान दौऱ्यावरही जाणार आहेत. या दौऱ्यात राजस्थानमधील पक्षाची ताकद वाढवण्यावर भर दिली जाणार जाईल. गोवा, मेघालय, त्रिपुरा आणि आसाममध्येही निवडणुकीत लढण्याचा निर्णय ममता बॅनर्जींनी घेतलाय.
संबंधित बातम्या :