महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांचं गुऱ्हाळ संपता संपेना; अखिलेश यादवांकडून थेट 16 उमेदवार जाहीर!
Loksabha Election 2024 : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाकडून थेट 16 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. समाजवादी पक्षाची पहिल्या यादीत एकाही ब्राह्मण किंवा वैश्य समाजातून तिकीट दिलेलं नाही.
लखनौ : पलटूराम नितीशकुमार, ममता दिदींचा स्वबळाचा नारा यामुळे इंडिया आघाडीत बिघाडी झाली असतानाच आता राज्यातही प्रकाश आंबेडकर यांच्या समावेशावरून महाविकास आघाडीत अजूनही ताळमेळ जमलेला नाही. त्याला प्रकाश आंबेडकर यांचा ताठर स्वभाव सुद्धा तितकाच कारणीभूत ठरत आहे. आजही (31 जानेवारी) प्रकाश आंबेडकर आपली ताठर भूमिका घेताना नाना पटोलेंवरील रोख कायम ठेवला. इतकंच नव्हे, तर अजूनही महाविकास आघाडीचा भाग नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे आंबेडकरांच्या मनात आहे तरी काय? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील जागावाटपाचे घोडे अजूनही अडले आहेत. दुसरीकडे, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाकडून थेट 16 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. समाजवादी पक्षाची पहिल्या यादीत एकाही ब्राह्मण किंवा वैश्य समाजातून तिकीट दिलेलं नाही. पक्षाच्या पहिल्या यादीत 11 ओबीसी, 1 मुस्लिम, 1 दलित, 1 ठाकूर, 2 खत्री यांचा समावेश आहे. 11 ओबीसी तिकिटांमध्ये 4 कुर्मी, 3 यादव, 2 शाक्य, 1 निषाद आणि 1 पाल आहेत. यादवांमधील उमेदवारी यादव कुटुंबातील आहे.
सपाकडून जाहीर करण्यात आलेले उमेदवार
- शफीकुर रहमान-संभल
- अक्षय यादव-फिरोजाबाद
- मैनपुरी-डिंपल यादव
- एटा-देवेश शाक्य
- धर्मेंद्र यादव-बदायूं
- खेरी - उत्कर्ष वर्मा
- धौहरा - आनंद भदौरिया
- उन्नाव-अनु टंडन
- लखनौ-रविदास मेहरोत्रा
- फर्रुखाबाद- नवल किशोर शाक्य
- अकबरपूर - राजारामपाल
- बांदा - शिवशंकरसिंह पटेल
- फैजाबाद - अवधेश प्रसाद
- आंबेडकर नगर - लालजी वर्मा
- बस्ती- राम प्रसाद चौधरी
दरम्यान, सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे अखिलेश यादव यांनी 94 वर्षीय डॉ. शफीकुर रहमान बरक यांनाही उमेदवारी दिली आहे. शफीकुर रहमान संभल लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. शफीकुर रहमान अजूनही सपाचे खासदार आहेत. शफीकुर रहमान हे पाच वेळा खासदार आणि उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक मोठे नाव आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने विक्रमी विजय मिळवला होता आणि उत्तर प्रदेशात 80 पैकी 62 जागा जिंकल्या होत्या, तेव्हाही शफीकुर रहमान यांनी भाजपच्या उमेदवाराचा दारूण पराभव केला होता. कदाचित त्यामुळेच अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा शफीकुर रहमानवर विश्वास व्यक्त केला आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीतही समाजवादी पक्षाने शफीकुर रहमान यांना संभल मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. येथे त्यांची स्पर्धा भाजपच्या परमेश्वर लाल सैनी यांच्याशी होती. त्यांनी भाजप उमेदवाराचा 1 लाख 74 हजार 826 मतांनी पराभव केला. भाजपमध्ये त्यांच्याशी स्पर्धा करण्याची ताकद नाही आणि त्यांचे वय कितीही असले तरी राजकारणात कुठेही तोड नाही हे त्यांच्या विजयाने सिद्ध झाले.
शफीकुर रहमान 5 वेळा खासदार
शफीकुर रहमान 5 वेळा खासदार राहिले आहेत. तथापि, मधल्या काळात त्यांनी बहुजन समाज पक्षात (बसपा) प्रवेश केला, परंतु लवकरच ते सपामध्ये परतले. शफीकुर रहमान सुरुवातीपासूनच समाजवादी पक्षासोबत आहेत. मुरादाबादमधून तीन वेळा आणि संभल लोकसभा मतदारसंघातून दोनदा निवडणूक जिंकली. 1996, 1998 आणि 2004 मध्ये त्यांनी सपाच्या तिकिटावर दणदणीत विजय मिळवला, पण 2009 मध्ये ते सपा सोडून बसपमध्ये दाखल झाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या