Deadliest floods in india : जाणून घ्या, भारताच्या इतिहासातील विध्वंसक भयावह पूर कोणते?
हवामान बदलामुळे पूर दुर्घटनेत वाढ झाल्याचं पाहायला मिळतं ! भारताच्या इतिहासात अनेक भीषण महापूर झाले, ज्यांनी लाखो लोकांचे प्राण घेतले, गेल्या काही वर्षात भारतात आलेल्या पूर दुर्घटनांचा आढावा घेऊया..

भारताच्या इतिहासात अनेक भीषण महापूर झाले आहेत, ज्यांनी लाखो लोकांचे प्राण घेतले, कोट्यवधींचे नुकसान केले आणि संपूर्ण भाग उद्ध्वस्त केले. खाली काही सर्वात भयावह महापुरांची माहिती दिली आहे
1987 चा बिहार पूर
ऑगस्ट1987 मध्ये कोसी नदीमुळे आलेल्या पुरामुळे बिहारचा 40 टक्के भाग पाण्याखाली गेला होता. ज्यामध्ये बिहारमधील एकूण 19 जिल्हे आणि 4722 पेक्षा जास्त गावांचा समावेश होता. यादरम्यान 1,00,00,000 हेक्टर शेतजमीन प्रभावित झाली होती. 17 लाखांहून अधिक घरे उद्धस्त झाली. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार या पुरात 1,399 लोक आणि 5,302 जनावरे मृत्युमुखी पडली.
2005 चा मुंबई पूर
26 जुलै 2005 रोजी मुंबई महानगरात झालेल्या विक्रमी 944 मिमी या 24 तासांच्या रेकॅार्ड मधील पावसामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात पूर आला. या दिवशी शहराला आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पावसाचा सामना करावा लागला होता.तर सकाळी 8 ते रात्री 8 या 12 तासांच्या कालावधीत मुंबईत 644 मिमी पाऊस पडला होता. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, पुरात अंदाजे 1094 लोकांचा मृत्यू झाला .मुंबईसाठी 24 तासांच्या कालावधीत 1974 मध्ये 575 मिमी (22.6 इंच) इतका विक्रमी पाऊस पडला होता.हा मुंबईतील रेकॉर्डवरील सर्वात जास्त पावसाचा दिवस आहे.
2013 चा उत्तराखंड पूर
भारताच्या अलीकडील इतिहासातील सर्वात वाईट हवामानाशी संबंधित पूर जून 2013 मध्ये आला होता, जेव्हा काही दिवसांच्या मुसळधार पावसामुळे आणि ढगफुटीमुळे राज्यात अचानक पूर आणि भूस्खलन होऊन उत्तराखंडमध्ये विनाशकारी पूर आला होता.
13 ते 17 जून 2013 दरम्यान पडलेल्या या भयावह पावसामुळे 5700 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते. राज्याच्या डोंगराळ भागात भूस्खलनामुळे अडकलेल्या 1,00,000 हून अधिक लोकांना बाहेर काढण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले. अनेकांना विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.राज्यातील 13 पैकी 12 जिल्ह्यांवर याचा परिणाम झाला तर रुद्रप्रयाग, उत्तरकाशी, पिथोरागड आणि चमोली हे चार जिल्हे सर्वात जास्त प्रभावित झाले.
2015 मधील तामिळनाडूचा पूर
नोव्हेंबर शेवट आणि डिसेंबर पूर्वमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे तामिळनाडू मधील अड्यार आणि कूम नद्यांना पूर आला होता. यामुळे भरपूर प्रमाणात आर्थिक नुकसान होऊन मानवी जीवितहानी झाली. ज्यामुळे 18लाख लोक प्रभावित होऊन या पूर दुर्घटनेमध्ये किमान 470 लोक मृत्युमुखी पडले तर 40,000 हून अधिक लोक विस्थापित झाले.
2018 चा केरळ पूर
2018 च्या केरळ पूर "शतकातील आपत्ती" म्हणून वर्णन केले गेले, केरळमध्ये पडलेल्या या अभूतपूर्व मुसळधार पावसामुळे भयावह पूर येऊन 483 लोक मृत्युमुखी पडले. केरळ राज्यात आलेला 1924 नंतरचा हा सर्वात मोठा पूर मानला जातो. यादरम्यान दहा लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले. या पूरादरम्यान केरळ राज्यातील 54धरणांपैकी तब्बल 35 दरवाजे केरळच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच उघडण्यात आले होते.या भयावह महापूर दुर्घटनांमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होऊन पायाभूत सुविधा आणि शेतीचे मोठे नुकसान झाले.
2021 चा महाराष्ट्रातील पूर
या पूरामुळे एकूण 251 लोकांचा मृत्यू होऊन शेकडो लोक बेपत्ता झाले. या पूरादरम्यान झालेल्या मुसळधार पाऊसामुळे आणि भूस्खलणामुळे महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांना फटका बसला. ज्यामध्ये रायगड जिल्हा सर्वाधिक प्रभावित झाला होता. मान्सून अभ्यासकांच्या म्हणण्यांनुसार महाराष्ट्राच्या इतिहासातील जुलै महिन्यात 40 वर्षांत झालेला हा सर्वात मोठा पाऊस होता. या पूराचा सर्वाधिक फटका रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना बसला होता.
महत्वाच्या बातम्या:
रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट!
पूर्वमोसमी पावसाचा जोर वाढला, अनेक भागात वादळी वाऱ्यासह वरुणराजाची जोरदार हजेरी, काही भागात पिकांना फटका























