Mulayam Singh Yadav : समाजवादी राजकारणातील सर्वांत मोठा आधारस्तंभ आणि युपीचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले 'धरतीपुत्र' मुलायम सिंह यादव पंचत्वात विलीन झाले. त्यांचा मुलगा आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सैफई येथील यादव कुटुंबापासून सुमारे 500 मीटर अंतरावर असलेल्या जत्रेच्या मैदानावर मुलायम सिंह यांच्या पार्थिवाला मुखाग्नि दिला. मुलायम सिंह यांच्या अंतिम दर्शनासाठी दीड लाखांहून अधिक लोक सैफईला पोहोचले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक, उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री जितिन प्रसाद, असीम अरुण, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर राव, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आदींना अंतिम दर्शन घेतले. 


राजनाथ, शरद पवार यांच्यासह डझनभर दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली


तत्पूर्वी, अंत्यदर्शनासाठी लाखो लोक जमले होते. दुसरीकडे देशभरातील व्हीआयपीही त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सैफईवर पोहोचले. सकाळी सुरू झालेली ही प्रक्रिया दुपारपर्यंत सुरु होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अभिनेते अभिषेक बच्चन यांनी मुलायम सिंह यांना अंत्यसंस्काराच्या आधी श्रद्धांजली वाहिली. सैफईतील पावसात नेताजींच्या पक्षातील कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होते. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर राव, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव थेट अंत्यसंस्कारस्थळी पोहोचले आणि अखिलेश यादव यांचे सांत्वन केले.






यूपी सरकारचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, केशव प्रसाद मौर्य, कॅबिनेट मंत्री राकेश सचान, जितिन प्रसाद, संजय निषाद आणि संजय सिंह यांनी नेताजींना श्रद्धांजली वाहिली. खासदार रिता बहुगुणा, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, राज्यमंत्री असीम अरुण आणि खासदार देवेंद्र सिंह भोले यांनीही सैफई जत्रा मैदानावर पोहोचून अंत्यदर्शन घेतले. भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत आणि राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैतही अंत्यदर्शनासाठी पोहोचले. राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांनीही त्यांना अखेरचा निरोप दिला. मनेका गांधी आणि त्यांचा मुलगा वरुण गांधी यांनीही सैफई येथे पोहोचून नेताजींच्या पार्थिवावर आदरांजली वाहिली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही श्रद्धांजली वाहिली.


रामगोपाल यांच्याकडून हृदयस्पर्शी आवाहन


मुलायम सिंह यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ज्यांना स्टेजवर पोहोचता आले नाही त्यांच्या संयमाचा बांध फुटला. त्यामुळे बॅरिकेड्सच्या खालून तसेच वरून स्टेजच्या दिशेने त्यांनी वाटचाल सुरू केली. हे पाहून आयुक्त डॉ.राजशेखर यांच्या विनंतीवरून प्राध्यापक राम गोपाल यादव यांनी माईक घेऊन लोकांना हृदयस्पर्शी आवाहन केले, मात्र त्यांच्या नेत्यापर्यंत पोहोचण्यासाठी गर्दी थांबत नव्हती.


पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता पण गर्दी एवढी वाढली की लोकांना सांभाळणे कठीण झाले. स्टेजसमोर तयार केलेल्या डीमध्येही लोक घुसले. दुसरीकडे सैफईकडे जाणारे सर्व रस्ते पूर्णपणे ठप्प झाले होते. सकाळी 10 वाजेपर्यंत 1 किमी अंतरावरून गाड्या थांबविल्या जात होत्या, परंतु नंतर 3 किमी अंतरापर्यंत वाहने थांबवण्यात आली. 


इतर महत्वाच्या बातम्या