Fodder Scam: चारा घोटाळ्यातील पाचव्या खटल्यात लालूंना पाच वर्षांच्या शिक्षा; जाणून घ्या या आधीचे चार खटले आणि मिळालेली शिक्षा
Fodder Scam: डुरांडा चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना पाचव्या खटल्यामध्ये पाच वर्षांची शिक्षा आणि 60 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. या आधीच्या चार खटल्यांमध्येही त्यांना दोषी मानण्यात आलं होतं.
Fodder Scam: राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना डुरांडा चारा घोटाळ्यातील पाचव्या खटल्यात पाच वर्षांची शिक्षा आणि 60 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 139.35 कोटी रुपयांच्या डोरांडा चारा घोटाळा प्रकरणी 15 फेब्रुवारी रोजी लालू प्रसाद यादव यांना रांचीतील विशेष सीबीआय कोर्टाकडून दोषी ठरवण्यात आलं होतं. आता त्यांच्यासह 38 जणांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यांना या आधी चार प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे.
लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात अजूनही एक खटला प्रलंबित असून त्यावर पटना सीबीआय न्यायालयात सुनावणी सुरू आहे. 74 वर्षीय लालू प्रसाद यादवांना अनेक आजारांनी ग्रासलं असून ते सध्या रांचीच्या न्यायालयात उपचार घेत आहेत.
बिहार आणि झारखंड राज्याच्या विभागणी आधी, 2000 सालच्या पूर्वी हे सर्व खटले पटना सीबीआय न्यायालयात सुरू होते. झारखंडच्या निर्मितीनंतर त्यातील पाच खटले हे रांची सीबीआय न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले. लालू प्रसाद यादवांना वेगवेगळ्या प्रकरणात आतापर्यंत सात वेळा तुरुंगवारी घडली असून 2013 साली ते पहिल्यांदा तुरुंगात गेले होते. त्यांच्या एकूण शिक्षेपैकी आठ महिने हे त्यांनी रांचीच्या सेंट्रल जेलमध्ये काढले आहेत तर इतर काळ हा न्यायालयीन कोठडीत घालवला.
लालू प्रसाद यादव यांच्या विरोधातील या आधीचे चार खटले,
पहिला खटला
चारा घोटाळ्यातील पहिल्या प्रकरणी, चायबासा ट्रेजरी प्रकरणातील 37.7 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना ऑक्टोबर 2013 मध्ये पाच वर्षांचा तुरुंगवास आणि 25 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. त्याच वर्षी 13 डिसेंबरला त्यांना जामीन मिळाला.
दुसरा खटला
देवघर ट्रेजरी प्रकरणातील 84.53 लाख रुपयांच्या भ्रष्टाचार खटल्याप्रकरणी लालू प्रसाद यादवांना साडे तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
तिसरा खटला
तिसरा खटला हा चायबासा ट्रेजरीशी संबंधित होता. 33.67 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी लालू प्रसाद यादवांना पाच वर्षांचा तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.
चौथा खटला
दुमका खटल्याशी संबंधित 3.13 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी लालू प्रसाद यादवांना आरोपी ठरवण्यात आलं होतं. त्यांना वेगवेगळ्या दोन प्रकरणात सात-सात वर्षांच्या तुरुंगवासाठी शिक्षा आणि एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.
काय आहे चारा घोटाळा?
देशभरात गाजलेला चारा घोटाळा हा 1996 साली सीबीआयच्या छापेमारीनंतर समोर आला होता. हा घोटाळा जवळपास 950 कोटी रुपयांचा असल्याचं सांगण्यात येतंय. सीबीआयने या प्रकरणाशी संबंधित 64 खटले दाखल केले होते. बिहार आणि झारखंडच्या विभागणीनंतर या प्रकरणातील खटल्यांचीही विभागणी झाली.
या प्रकरणात एकूण 170 जणांवर आरोप निश्चित करण्यात आले होते. त्यामधील 55 जणांचा मृत्यू झाला आहे तर सात जण माफीचे साक्षीदार बनले आहेत.
संबंधित बातम्या: