एक्स्प्लोर
Advertisement
मोदी ते केजरीवाल... कुमार विश्वास यांचे खडे बोल, व्हिडीओ व्हायरल!
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते आणि सुप्रसिद्ध कवी कुमार विश्वास हे आपल्या सडेतोड भूमिकेसाठीही ओळखले जातात. जम्मू-काश्मीरमधील सीआरपीएफ जवानांना फुटीरतावाद्यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याच्या घटनेचा निषेध नोंदवत, कुमार विश्वास यांनी देशातील सर्वच राजकीय नेत्यांवर निशाणा साधला. कुमार विश्वास यांचा 13 मिनिटांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
‘We, The Nation!’ या मथळ्याचा कुमार विश्वास यांचा हा व्हिडोओ 13 मिनिटांचा असून, तो त्यांनी यूट्यूबवर अपलोड केला आहे. यूट्यूबवर आतापर्यंत 70 हजार व्ह्यूजचा टप्पा या व्हिडीओने पार केला आहे. फेसबुकवर हजारो लोकांनी शेअर केला आहे, तर ट्विटरही मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.
कुमार विश्वास यांनी राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत सर्वच नेत्यांवर निशाणा साधला. विशेष म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमधील कथित भ्रष्टाचारावरही कुमार विश्वास यांनी बोट ठेवले आहे.
काश्मीरमध्ये सीआरपीएफ जवानांना दगडफेक करणाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओचा आधार घेत कुमार विश्वास यांनी आपल्या संवादाची सुरुवात केली.
सशस्त्र जवानांचे केवळ कायद्याच्या बेड्यांनी पाय बांधले होते, असे म्हणत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. “ज्या पक्षाचं सरकार केंद्र आणि जम्मू-काश्मीर अशा दोन्ही ठिकाणी आहे, तेथेच भारतमातेच्या सुपुत्रांसोबत असं वर्तन होत आहे.”, असे ते म्हणाले. शिवाय, श्रीनगरमध्ये झालेल्या 6 टक्के मतदानावरही कुमार विश्वास प्रश्न उपस्थित करत म्हणाले, एकतर लोकांना विश्वास नाही किंवा ते भयभीत आहेत. लोकांमध्ये विश्वास कायम राहावा, यासाठी सरकारने आवाहन करण्याची मागणीही कुमार यांनी यावेळी केली.
“आपण देशासाठी आपापले पक्ष आणि आपापल्या नेत्यांच्या चापलूसीच्या चौकटीतून काही वेळासाठी बाहेर येऊ शकतो का? केंद्र आणि राज्यात दोन्ही ठिकाणी एकच सरकार असताना कुणीतरी लफंगा आमच्या हिंदुस्तानच्या सुपुत्रावर हात कसा उगारतो?”, असा सवाल आक्रमक होत कुमार विश्वास यांनी विचारला.
“मोदी-मोदी, अरविंद-अरविंद, राहुल-राहुल, असे आपण करत असोत. पण आपल्याला हे माहित नाहीय का की, मोदी, अरविंद, राहुल, योगी केवळ पाच, दहा किंवा जास्तीत जास्त 25 वर्षांसाठी सत्तेवर आहेत. मात्र, आपला देश 5 हजार वर्षे जुना आणि आपल्यानंतर हजारो वर्षे राहणार आहे.”, असं देशवासियांना उद्देशून कुमार विश्वास म्हणाले.
दरम्यान, ‘आप’चे नेते असलेल्या कुमार विश्वास यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. “जर तुम्ही भ्रष्टाचारापासून मुक्तीच्या नावाखाली सरकार स्थापन करत असाल आणि भ्रष्टाचार प्रकरणात तुमच्याच लोकांची नावं आल्यानंतर मौन बाळगत असाल, तर लोक प्रश्न विचारणारच.”, असे म्हणत कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांचं नाव न घेता म्हटलं.
पाहा व्हिडीओ -
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
राजकारण
बातम्या
निवडणूक
Advertisement