भाजप नेत्यांच्या बेताल वक्तव्याने कतार, बहरीनमध्ये संताप; जाणून घ्या आखाती देश भारतासाठी महत्त्वाचे का?
India and Gulf Countries : भाजप नेत्यांच्या बेताल वक्तव्याचे पडसाद आखाती देशात उमटले. त्यानंतर भाजपने नुपूर शर्मा यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. जाणून घ्या आखाती देश भारतासाठी महत्त्वाचे का आहेत?
इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपने प्रवक्त्या नुपूर शर्मा, दिल्ली भाजप नेते नवीन कुमार जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर बहारीन, कतार, कुवेत, इराण आणि ओमानसह अन्य आखाती देशांमध्ये भारताविरोधात संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचे म्हटले जाते. आखाती देशांसोबत भारताचे चांगले संबंध राहिले आहेत. अशा परिस्थितीत भारताविरोधात आखाती देशांमध्ये संताप व्यक्त होणे ही चिंतेची बाब म्हटली जाते.
गल्फ को-ऑपरेशन कौन्सिलच्या (GCC) सदस्य देशांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय वास्तव्य करतात. गल्फ को-ऑपरेशन कौन्सिलमध्ये प्रामुख्याने कुवेत, ओमान, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार आणि बहरीन या देशांचा समावेश आहे. या देशांमध्ये लाखो भारतीय काम करतात. आखाती देशात स्थलांतरित कामगारांपैकी 30 टक्के कामगार हे भारतीय आहेत.
आखाती देशांतून भारताला निधी
आखाती देशांमध्ये काम करणाऱ्या भारतीय कामगारांकडून संबंधित देशांच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावला जातो. पण, त्याचवेळी रोजगारासाठी स्थलांतरीत असलेल्या कामगारांच्या मार्फत देशात परकीय चलनदेखील मोठ्या प्रमाणावर मिळते. परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, पश्चिम आशियात जवळपास 80 लाखांहून अधिक भारतीयांचे वास्तव्य आहे. यातील बहुतांशी GCC या देशांमध्ये वास्तव्य करतात. या देशांमधून रोजगारासाठी स्थलांतरीत असलेल्या भारतीयांकडून 40 अब्ज डॉलरहून अधिक रक्कम भारतात येतात.
भारतासाठी आखाती देशाचे महत्त्व काय?
भारतासाठी राजकीय, आर्थिक, सामरीक आणि सांस्कृतिकदृष्ट्या आखाती देश महत्त्वाचे आहेत. GCC सदस्य देश आणि भारत परस्पर सहकार्याने विकास करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच भारतासाठी व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा यांसारख्या क्षेत्रात महत्त्वाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. तर, तंत्रज्ञान, बांधकाम, हॉटेल आणि वित्त सेवांशी संबंधित कंपन्या आखाती देशांमध्ये सक्रिय आहेत. भारत आणि आखाती देशांमध्ये चांगले व्यापारी संबंध आहेत. यामध्ये युएई आणि सौदी अरेबिया महत्त्वाचे देश आहेत. या आखाती देशांचे भौगोलिक महत्त्वदेखील आहेत. भारत इराणमार्गे मध्य आशिया आणि युरोपमध्ये पोहचू शकतो. तर, ओमानमार्गे पश्चिम हिंदी महासागरावर नियंत्रण ठेवतो. ओमानमध्ये भारतीय नौदलाचा तळ आणि एक हवाई तळ आहे.
आंतरराष्ट्रीय राजकारणात आखाती देशांनी भारतासोबत सहकार्याची भूमिका घेतली असल्याचे दिसून आले आहे. पाकिस्तानने भारताविरोधात काश्मीरच्या मुद्यावर अनेकदा कांगावा करण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय मंचावर केला. मात्र, आखाती देशांनी आपले वजन भारताच्या बाजूने ठेवले.