Mysuru Dasara 2022 : विजयादशमी म्हणजेच दसऱ्याचा सण आज देशभरात जल्लोषात साजरा केला जात आहे. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानल्या गेलेल्या दसऱ्याचा सण भारतातील विविध प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. पण मैसूरचा दसरा (Mysuru Dasara) जगभरात लोकप्रिय आहे.
चामुंदेश्वरी देवीची मूर्ती सुशोभित हत्तीवर ठेवून काढली जाणारी मिरवणूक हे मैसूरच्या संस्थानी दसऱ्याचे विशेष आकर्षण आहे.
देश-विदेशातील पर्यटक हा उत्सव पाहण्यासाठी भारतात येतात. संगीत, नृत्य, वाद्यवादन, हत्ती, घोडे, उंट यांची मिरवणूक हे या भव्य-दिव्य उत्सवाचं विशेष आकर्षण आहे.
मैसूरच्या दसऱ्याला कर्नाटकात 'नदहब्बा' असे म्हणतात. एका आख्यायिकेनुसार, दसऱ्या दिवशी चामुंडेश्वरी देवीने महिषासुराचा वध केला. त्यामुळेच या दिवसाला 'विजयादशमी' म्हणतात. महिषासुराच्या नावावरूनच या प्रदेशाला मैसूर असं नाव मिळालं आहे.
दहा दिवस चालणारा मैसूरचा शाही दसरा
'मैसूरचा दसरा' हा दहा दिवस चालतो. या उत्सवाच्या पहिल्या दिवशी वडियार राजघराण्यातील दांपत्य म्हैसूरमधील चामुंडी पर्वतावरील चामुंडी मंदिरात श्री चामुंडेश्वरी देवीची यथासांग पूजा करीत. आजही वडियार घराण्याचे वारस श्रीकांतदत्त नृसिंहराज वडियार दसऱ्याच्या दिवशी खाजगी दरबार भरवून ही प्रथा पाळतात. नवरात्रीच्या नवव्या दिवशी म्हणजे महानवमीच्या दिवशी राजघराण्यातील तलवारींची पूजा करून हत्ती, घोडे व उंटाची मोठी मिरवणूक काढली जाते.
'म्हैसूरचा दसऱ्या'चे आणखी एक आकर्षण म्हणजे मैसूर राजवाड्याच्या विरूद्ध दिशेला असलेल्या मैदानावर भरणारी यात्रा. दसरा सुरू झाल्यापासून सुरू झाल्यापासून ही यात्रा सुरू होते. ती डिसेंबरपर्यंत चालते. या यात्रेत विविध स्टॉल असतात. त्यात कपडे, प्लॅस्टिक वस्तू, किचनमधील वस्तू, कॉस्मेटिक्स, खाण्यापिण्याचे पदार्थ यांचा समावेश असतो. त्यामुळे लोकांची प्रचंड गर्दी होते.
नवरात्राच्या दहा दिवसांत मैसूरमध्ये संगीत व नृत्याचे कार्यक्रम होतात. जगभरातील अनेक सेलिब्रिटी या यात्रेला हजेरी लावतात. तसेच या यात्रेत होणाऱ्या कुस्त्यादेखील आकर्षणाचा बिंदू आहे. जगभरातील प्रसिद्ध कुस्तीगीर येथे येत असतात.
संंबंधित बातम्या