Shashi Tharoor : सध्या काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक (Congress President Election) लागली आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) आणि तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) आमने सामने आहेत. दरम्यान, या निवडणुकीबाबत शशी थरुर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मी काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे. त्यामुळं अध्यक्षपदासाठी भरलेला अर्ज मागे घेणार नसल्याचे शशी थरुर यांनी स्पष्ट केलं आहे.


नेमकं काय म्हणाले शशी थरुर


मी काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे. ज्यांनी माझ्यासाठी सर्वस्व पणाला लावले, त्यांचा मी कधीही विश्वासघात करणार नाही. मी त्यांना कधीही निराश करणार नसल्याचे शशी थरुर म्हणाले.  काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत मी स्वतःसाठी नसून, काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी आहे. ज्यांनी माझ्याशी संपर्क साधून मला ही निवडणूक लढवण्याची विनंती केली आहे, असे थरुर यावेळी म्हणाले. आपल्या उमेदवारीने देशाला सक्षम विरोधी पक्ष मिळेल, असा विश्वास शशी थरूर यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसच्या वर्तमान परिस्थितीवर वाईट बोलणार नाही. मात्र पक्षात बदल आणू इच्छित असल्याचे थरुर यांनी सांगितले. एकीकडे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दुसरीकडे राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा या दोन्हीची देशात चर्चा आहे. यामुळं पक्ष जागृत होत असून देशात चांगला संदेश जात आहे. आमचा पक्ष मी नाही तर आम्ही वाला आहे असही थरुर यांनी सांगितले. 


अध्यक्षपदासाठी  मल्लिकार्जुन खर्गेंची मजबूत दावेदारी


काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा (LoP in Rajya Sabha)राजीनामा दिला आहे.  एक व्यक्ती एक पद या सूत्रानुसार खरगेंनी हा राजीनामा दिला आहे. दरम्यान खर्गे यांची अध्यक्षपदासाठी दावेदारी मजबूत मानली जात आहे. त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा अर्ज भरल्यानंतर राज्यसभा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. आता राज्यसभेतलं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस कुणाकडे सोपवणार याची उत्सुकता देखील लागली आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी पी चिदंबरम, दिग्विजय सिंह, जयराम रमेश यांची नावे चर्चेत आहेत. दरम्यान येत्या  17 ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. तर 19 ऑक्टोबरला अध्यक्षपदाचा निकाल लागणार आहे. त्यामुळं आता अध्यक्षपदाची माळ थरुर यांच्या गळ्यात पडणार की खर्गे हे यांच्या गळ्यात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होण्याची शक्यता अधिक; राज्यसभेतील विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा