Night Curfew in Kerala : केरळात कोरोनाचं संकट गडद; मुख्यमंत्र्यांकडून 'नाईट कर्फ्यू'ची घोषणा
Night Curfew in Kerala : केरळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच केरळ सरकारनं नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे.
Night Curfew in Kerala : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अशातच देशात कोरोनाबाधितांच्या आकड्यात काही प्रमाणात घट आली असली तरी केरळात मात्र कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. केरळमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी शनिवारी राज्यात नवा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, केरळात रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हे आदेश सोमवारपासून लागू करण्यात येणार आहेत.
गेल्या 24 तासांत केरळात 31265 रुग्णांची नोंद
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) यांनी सांगितलं की, "कोरोना महामारीचा (Corona Pandemic) प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात टेस्टिंग वाढवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. शनिवारी केरळात 1,67,497 लोकांचे सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले. त्यापैकी 31,265 लोकांचे सॅम्पल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यासोबतच 153 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे."
केंद्राच्या वतीन आधीच दिलेला इशारा
गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोनाच्या 40 हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद केली जात आहे. यापैकी जास्त रुग्णांची नोंद ही महाराष्ट्र आणि केरळात करण्यात येत आहे. यामुळे केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नाईट कर्फ्यू लावण्यावर विचार करण्यास सांगितलं होतं. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, केरळात अचानक कोरोना रुग्णसंख्येत वाढ होण्याचं कारण काही दिवसांपूर्वी साजरा करण्यात आलेला ओनमचा सण आहे.
महाराष्ट्रात काल (शनिवारी) 4,831 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यात काल (शनिवारी) 4,831 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 455 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 59 हजार 906 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.02 टक्के आहे.
राज्यात काल (शनिवारी) 126 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. तब्बल 40 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 51 हजार 821 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13,054 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (42), नंदूरबार (2), धुळे (19), जालना (33), परभणी (30), हिंगोली (59), नांदेड (29), अकोला (22), वाशिम (03), बुलढाणा (50), यवतमाळ (07), नागपूर (75), वर्धा (5), भंडारा (8), गोंदिया (4), गडचिरोली (32) या सतरा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :