अपक्ष आमदार एच नागेश आणि आर शंकर यांनी मंत्रिपदासह आमदारकीचा राजीनामा दिल्या राजीनामा देणाऱ्या आमदारांची संख्या आता 15 झाली आहे.
एकंदरीत स्थिती पाहता सरकार कुठल्याही क्षणी कोसळू शकते. आज कर्नाटक विधानसभा अध्यक्ष आमदारांच्या राजीनाम्यांबाबत आपला निर्णय देणार आहेत. काँग्रेसने विधानसभा अध्यक्षांना राजीनामे मंजूर करू नये अशी विनंती केली आहे. सरकार वाचविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काँग्रेसने आपल्या विधिमंडळ सदस्यांची बैठक आज बोलावली आहे.
सोमवारी येदियुरप्पा यांनी म्हटले होते की, मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आपल्या आंदांचा विश्वास गमावला आहे. म्हणून त्यांनी राजीनामा देणे आवश्यक आहे. या मागणीसाठी कर्नाटक भाजप प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दुसरीकडे येदियुरप्पा यांचे पीए संतोष यांचा अपक्ष आमदार एच नागेश यांच्यासोबत फोटो व्हायरल झाल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. मात्र येदियुरप्पा यांनी पीए संतोष हे केवळ अभिनंदन करायला गेले होते, असे सांगितले आहे.
दरम्यान काल, कर्नाटकातील सत्तासंघर्षाचे जोरदार पडसाद लोकसभेत देखील उमटले. भाजपकडून लोकशाहीचा अवमान होत असल्याची टीका काँग्रेसने केली तर कर्नाटकात जे होत आहे, त्याच्याशी आमचा काही संबंध नसल्याचे भाजपने स्पष्ट केले.
या आमदारांचा राजीनामा मंजूर झाला तर कर्नाटक राज्यातील बहुमत हे भाजपकडे झुकण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान या बंडखोरांना शमविण्यासाठी जेडीएसने नवी खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. कर्नाटकच्या जेडीएस सरकारमधील सर्वच्या सर्व मंत्रिमंडळानं राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळातील 21 च्या 21 मंत्र्यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत.
माहितीनुसार कर्नाटकचे राज्यपाल 17 जुलै रोजी विधानसभेत बहुमत सादर करण्याचे आदेश देऊ शकतात. कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांची संख्या सातत्याने घटत आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत. बहुमतासाठी 113 आमदारांची आवश्यकता आहे.
काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षांसह एकूण 80 आमदार आहेत. तर जेडीएसकडे 37 आमदार आहेत. दोन्ही मिळून 117 आमदारांच्या संख्याबळावर जेडीएस-काँग्रेस सत्तेत आले होते. तसेच बहुजन समाज पार्टी आणि एका अपक्ष आमदारानेदेखील या सरकारला पाठिंबा दिला होता.