लखनौ : उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये चोरीचं एक वेगळच प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणात बँकेचा एक वरिष्ठ अधिकारीच चोर निघाला आहे. प्रयागराग येथील बँक ऑफ इंडियामध्ये वशिष्ठ कुमार या अधिकाऱ्याने बँकेला जवळपास सव्वा चार कोटींना चुना लावला आहे.


वशिष्ठ कुमार बँकेचा अधिकारी असल्याने त्याच्यावर बँकेतील पैसे सांभाळून ठेवण्याची जबाबदारी होती. मात्र वशिष्ठ कुमारने बँकेतील रक्कमेवरच डल्ला मारला. वशिष्ठ कुमार बँकेतील पैसे बाहेर लोकांना व्याजाने देत होता. सुरुवातीला त्याने काही लाख रुपये व्याजावर देण्यास सुरुवात केली होती. लोकांनी पैसे परत केल्यावर मुळ रक्कम तो पुन्हा बँकेत पुन्हा ठेवत असे आणि व्याजाची रक्कम स्वत:कडे ठेवत होता.


मात्र बँकेच्या पैशांवर व्याजापोटी मिळणारी रक्कम मोठी असल्याने वशिष्ठ कुमारने कोट्यवधी रुपये व्याजाने दिले. एका रिअल इस्टेट व्यापाऱ्याला वशिष्ठने साडे चार कोटी रुपये पाच टक्के व्याजाने दिले. मात्र काही दिवसांपूर्वी बँकेत ऑडिट झाल्याने वशिष्ठचं पितळ उघडं पडलं आणि हा घोटाळा उघडकीस आला.


ऑडिटनंतर वशिष्ठ कुमारने बँकेतील पैशांची चोरी केल्याचं उघड झालं. गेल्या अनेक वर्षांपासून तो बँकेतील पैसे व्याजाने बाहेर देत असल्याचं समोर आलं. या व्याजावर वशिष्ठ कुमारने लाखो रुपये कमावल्याचंही समोर आलं आहे. प्रकरण उघडकीस आल्यानंतर बँकेच्या तक्रारीनंतर बँक अधिकारी वशिष्ठ कुमार आणि रिअल इस्टेट व्यापारी यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास करुन कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.