Aroosa Parvaiz: कर्नाटकात हिजाबवरून पेटलेलं रणकंदन हे आता थेट जम्मू-काश्मीरपर्यंत पोहोचलं आहे. कर्नाटकातील मुली हिजाबसाठी आंदोलन करत असताना जम्मू काश्मीरमधील बारावीच्या परीक्षेत राज्यात पहिल्या आलेल्या मुलीने हिजाब घालण्यास नकार दिला आहे. अरुसा परवेझ असं तिचं नाव असून तिला हिजाब का घातला नाही या गोष्टीवरून ट्रोल केलं जातंय. तिला गळा चिरण्याच्या, ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. आपण मुस्लिम धर्म मानतो, हृदयाने मुस्लीम आहे पण त्यासाठी हिजाब घालायची गरज नसल्याचं सांगत तिने कट्टरवाद्यांना सडेतोड उत्तर दिलंय.
कर्नाटकातील हिजाब घातलेली एक मुलगी 'अल्ला हू अकबर'चा नारा देत देशभरातील हिजाब समर्थकांची रोल मॉडेल बनली आहे. त्या मुलीचा आदर्श घेऊन जम्मू काश्मीर बोर्ड परीक्षेत पहिल्या आलेल्या अरुसाला हिजाब घालण्याचा सल्ला सोशल मीडियावर दिला जातोय. हिजाब घातला नाही तर तिला ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जातायत. पण ही धाडसी मुलगी ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देते, 'मी मुस्लिम धर्म मानते, मुस्लिम तत्वांना मानते. पण एक चांगली मुसलमान होण्यासाठी मला हिजाब घालण्याची गरज वाटत नाही.'
कोण आहे अरुसा परवेझ?
जम्मू-काश्मीर बोर्ड परीक्षेमध्ये सायन्स स्ट्रीममध्ये 500 पैकी 499 मार्क्स घेऊन अरुसा परवेझ ही राज्यात पहिली आली आहे. तिचे अभिनंदन करताना एका पोलीस अधिकाऱ्याने सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच तिचे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सत्कारही करण्यात आला. याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. आता याच फोटोंवरून तिला ट्रोल केलं जात आहे. हिजाब का घातला नाही असा सवाल तिला विचारला जातोय. तिला ठार मारण्याच्या धमक्याही दिल्या जातायत.
अरुसा परवेझ ही श्रीनगरची रहिवासी आहे. बोर्ड परीक्षेत पहिली आल्यावर जिल्हा प्रशासनाने तिचा सत्कार केला होता.
काय म्हणते अरुसा?
ट्रोल करण्यात आल्यानंतर त्याला उत्तर देताना अरुसा परवेझ म्हणते की, "एखाद्या धर्मावरची श्रद्धा ही हिजाब घालणे किंवा न घालणे यावर ठरत नाही. यावरून मला ट्रोल करणाऱ्यांपेक्षा माझं अल्लाह वरचं प्रेम जास्त असेल. मी हृदयाने मुस्लिम आहे, हिजाबने नाही. हिजाब घालणे हे आवश्यक आहे, पण त्या आधी आपण मुस्लिम तत्वांचे काटेकोरपणे पालन करतो का हे पाहणे गरजेचं आहे."
अरुसाने घेतलेल्या या भूमिकेचं अनेकांनी कौतुक केलंय.
शिक्षण संस्थामध्ये धर्म आणावा का?
शाळा, महाविद्यालयं या शिक्षण संस्था आहेत. या ठिकाणी शिक्षण आणि मुलांचे व्यक्तीमत्व विकास होणं अपेक्षित आहे. पण अशा धार्मिक मुद्द्यावरून आता या ठिकाणचे वातावरण गढूळ होत आहे. या धार्मिक मुद्द्यांना राजकारणाची किनार असते. पण यामध्ये महाविद्यालयीन युवक-युवती नाहक भरडले जात असल्याचं दिसून येतंय.
संबंधित बातम्या: