Lalu Prasad Yadav Fodder Scam : राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे. आज रांचीतील विशेष सीबीआय कोर्ट दोरांडा चारा घोटाळा (Fodder Scam) प्रकरणी शिक्षा सुनावणार आहे. 15 फेब्रुवारी रोजी न्यायालयानं लालू प्रसाद यादव यांना या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. या पाचव्या प्रकरणापूर्वी लालू यादव यांना इतर चार प्रकरणांमध्ये 14 वर्षांची शिक्षा झाली आहे. 


दोरांडा चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी 


139 कोटी रुपयांच्या दोरांडा चारा घोटाळा प्रकरणी 15 फेब्रुवारी रोजी लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. लालू प्रसाद यादव यांच्यासह 38 दोषींच्या शिक्षेवर आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिक्षा सुनावण्यात येणार आहे. यापूर्वी 15 फेब्रुवारी रोजी विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. शशि यांनी 41 जणांना दोषी ठरवून 21 फेब्रुवारी रोजी शिक्षेवरील सुनावणी निश्चित केली होती. आज यापैकी 38 जणांना शिक्षा होणार आहे. अन्य तीन दोषी 15 फेब्रुवारीला न्यायालयात हजर झाले नाहीत. त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. ज्या 38 जणांना आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे, त्यापैकी 35 जण बिरसा मुंडा तुरुंगात कैद आहेत. तर लालू प्रसाद यादव, डॉ. के.एम. प्रसाद आणि यशवंत सहाय यांना प्रकृतीच्या कारणास्तव राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) मध्ये दाखल करण्यात आलं आहे.


व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी 


दोरंडा चारा घोटाळा प्रकरणी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दोषींना शिक्षेसाठी हजर केलं जाणार आहे. बिरसा मुंडा तुरुंग अधीक्षक हमीद अख्तर यांनी सांगितले की, न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे लॅपटॉपची व्यवस्था करण्यात आली आहे. आज 12 वाजता न्यायालयात सुनावणी सुरु होणार आहे. या सुनावणीत दोषींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. 


लालू प्रसाद यादव यांना होऊ शकते शिक्षा 


न्यायालयानं लालू प्रसाद यादव यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 409, 420, 467, 468, 471 कट रचण्याशी संबंधित कलम 120बी आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 13(2) अंतर्गत दोषी ठरवलं आहे. या कलमांनुसार, त्याला 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याच्या चार वेगवेगळ्या प्रकरणात यापूर्वीच 14 वर्षांची शिक्षा झाली आहे.


काय आहे दोरंडा प्रकरण?


1990 ते 1995 साली दोरंडा कोषागारातून बेकायदेशीरपणे 139.35 कोटी रुपये काढण्यात आले होते. हे चारा घोटाळ्यातील सर्वात मोठं प्रकरण आहे. याप्रकरणी 1996 साली 170 आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यामधील 55 आरोपींचा मृत्यू झाला असून 7 आरोपी हे साक्षीदार बनले आहेत. तसेच दोन आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. तर 6 आरोपी फरार आहेत. दोरंडा ट्रेझरीमधून 139 कोटी रुपये अवैध पद्धतीनं काढल्याप्रकरणात लालू प्रसाद यादव यांना कोर्टानं दोषी ठरवलं आहे. तर या प्रकरणात इतर 24 जणांची कोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे. 1996 साली झालेल्या चारा घोटाळाप्रकरणी 26 वर्षांनंतर न्यायालयानं निकाल दिला आहे. आज या प्रकरणातील 38 दोषींच्या शिक्षेवर सुनावणी पार पडणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Lalu Yadav Fodder Scam : लालू प्रसाद यादव यांनी तुरुंगवारी घडवणारा, चारा घोटाळा आहे तरी काय?


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha