ABP Cvoter Karnataka Opinion Poll : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे.  सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला आहे. भाजप, काँग्रेससह इतर अन्य पक्षांनी सत्तेचा दावा केलाय. कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एबीपी-सी वोटरच्या महाओपिनिअन पोल घेतला. सध्या अवघ्या देशाचं लक्ष लागलं ते कर्नाटकात.... कर्नाटकात निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे... पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी कर्नाटकात तळ ठोकून आहेत... प्रचाराच्या तोफा धडाडतायत... अशात कर्नाटकची जनता कुणाला कौल देणार? कर्नाटकात कुणाचं सरकार बनणार? या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी एबीपी आणि सी वोटरचा महाओपिनियन पोल घेण्यात आलाय... या सर्व्हेनुसार कर्नाटकात काँग्रेस बहुमताचा आकडा गाठण्याची शक्यता आहे... बसवराज बोम्मईंना मोठा धक्का बसण्याची शक्यता ओपिनिअन पोलमधून वर्तवण्यात आली आहे. 224 जागांसाठी 10 मे रोजी कर्नाटकात मतदान होणार आहे... आणि 13 मे रोजी निकाल लागणार आहे. 


224 सदस्यीय कर्नाटक विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ 24 मे रोजी संपत आहे. कर्नाटकातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजप, काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल निवडणुकीच्या रिंगणात असले तरी खरी लढत ही भाजप आणि काँग्रेसमध्येच आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेत येणार असल्याचं ओपिनियन पोलचा अंदाज आहे. राज्य सरकारच्या कामकाजावर जनता नाराज असल्याचे सर्व्हेतून दिसून येत आहे.


कर्नाटकात कुणाला कौल?


((एबीपी-सी वोटर सर्व्हे))


एकूण जागा 224


काँग्रेस- 107 ते 119 जागा
भाजप- 76 ते 86 जागा
जेडीएस- 23 ते 35
इतर- 0-5 जागा


 


मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला पसंती?
((एबीपी-सी वोटर सर्व्हे))


बोम्मई- 31%
सिद्धरामैया-41%
कुमारस्वामी-22%
डीके शिवकुमार-3%
इतर- 3%



राज्य सरकारची कामगिरी कशी राहिली?
((एबीपी-सी वोटर सर्व्हे))
चांगली- 29%
सरासरी-19%
वाईट-52%


मुख्यमंत्र्यांचे कामकाज कसे राहिले?
((एबीपी-सी वोटर सर्व्हे))
चांगले-25%
सरासरी-24%
वाईट-51% 


पीएम मोदी यांचे काम कसे आहे ?
((एबीपी-सी वोटर सर्व्हे))
चांगले-49%
सरासरी-18%
वाईट-33% 


10 मे रोजी मतदान


कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी येत्या 10 मे रोजी निवडणूक होत आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचं दिसून येतंय. कर्नाटकाच्या राजकारणात  लिंगायत आणि वोक्कालिंग समाजाचा दबदबा आहे. लिंगायत समाजाची 18 टक्के लोकसंख्या आणि वोक्कलिंग समाजाची 14 टक्के लोकसंख्या ही राजकारणात परिणामकारक ठरतेय. या दोन्ही समाजाची मतं आपल्याच पारड्यात पडावी यासाठी सर्वच पक्षांकडून रस्सीखेच सुरू आहे. 


2018 च्या निवडणुकीचा निकाल?


कर्नाटकमध्ये 2018 च्या विधानसभा  निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. भाजपने 224 जागांपैकी 104 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने 80 जागा आणि जेडीएसने 37 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसच्या आमदारांनी बंड केलं आणि भाजपमध्ये सामील झाले. कर्नाटकात सध्या भाजपकडे 119 जागा आहेत. तर काँग्रेसकडे 75, तर मित्रपक्ष जेडीएसकडे एकूण 28 जागा आहेत.