Karauli Violence : राजस्थानमधील करौली येथे उसळलेल्या हिंसाचारामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. परिस्थिती पाहता प्रशासनाने परिसरातील कर्फ्यू 7 एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राजस्थान काँग्रेसने करौली हिसांचार घटनेच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय शोध समितीची स्थापन केली आहे. या समितीत आमदार जितेंद्र सिंह आणि रफिक खान आणि करौली जिल्ह्याचे प्रभारी ललित यादव यांचा समावेश आहे. हे पॅनल करौलीतील घटनास्थळी भेट देऊन अहवाल राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीला सादर करेल. प्रशासनाने म्हटले आहे की, करौलीतील परिस्थिती सामान्य नाही, प्रशासन परिसरावर बारीक लक्ष ठेवून आहे.


जिल्हा दंडाधिकारी राजेंद्र सिंह शेखावत यांनी सांगितलं आहे की, 'कायदा आणि सुव्यवस्थेनुसार सध्याची परिस्थिती सामान्य नाही. या पार्श्वभूमीवर कर्फ्यूचा 7 एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करौली येथे बाईक रॅलीदरम्यान दगडफेक आणि जाळपोळसह हिंसाचार झाल्याच्या घटनेनंतर 2 एप्रिलपासून 4 एप्रिलपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आला होता, परंतु अजूनही परिस्थिती सामान्य नसल्यामुळे कर्फ्यू 7 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे.'


कर्फ्यूमध्ये दोन तासांची सूट
राजेंद्र सिंह शेखावत यांनी सांगितले की, सरकारी कार्यालये, न्यायालयीन कर्मचारी, अधिकारी आणि परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कर्फ्यू शिथिल करण्याची परवानगी देण्यात आली. कर्फ्यूच्या काळात दूध, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी पोलिसांच्या उपस्थितीत दिवसभरात दोन तासांची सूट देण्यात येणार आहे.


करौलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक किशोर बुटोलिया यांनी सांगितले की, हिंसाचारा संदर्भात अटक करण्यात आलेल्या 13 आरोपींना सोमवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सोमवारी सकाळी कर्फ्यू दोन तासांसाठी शिथील करण्यात आला असून यादरम्यान कुठूनही अनुचित प्रकार घडला नाही. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.


बाईक रॅलीवर हल्ला
शनिवारी राजस्थानमधील करौली शहरात हिंदू नववर्षानिमित्त हिंदू संघटनांनी बाईक रॅली काढली होती. ही बाईक रॅली मुस्लीम वस्तीतून जात होती, यावेळी काही उपद्रवींनी बाईक रॅलीवर दगडफेक केली. त्यानंतर परिस्थिती चिघळली आणि परिसरात मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि दगडफेक झाली. दंगलखोरांनी दुकाने पेटवली. या पार्श्वभूमवर पोलिसांनी कारवाई करत 46 जणांना अटक केली असून 7 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी एकूण 21 दुचाकी आणि चारचाकी वाहने जप्त केली आहेत.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha