मोलकरणीचा 8 वर्ष अमानुष छळ, जीभेनं फरशी पुसायला लावली!
Jharkhand BJP Seema Patra: मोलकरणीला ओलीस ठेवत तिचा अमानुष छळ केल्याप्रकरणी भाजप नेत्या आणि माजी IAS पत्नी असलेल्या महिलेस अटक करण्यात आली आहे.

Jharkhand News : झारखंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मोलकरणीला ओलीस ठेवत तिचा अमानुष छळ केल्याप्रकरणी भाजप नेत्या आणि माजी IAS पत्नी असलेल्या महिलेस अटक करण्यात आली आहे. सीमा पात्रा असं अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे या पीडित महिलेला सीमा पात्रा यांनी जिभेनं फरशी साफ करायला लावली. तसेच पीडितेला जबर मारहाण देखील करण्यात आली. 8 वर्षांपासून या मोलकरणीचा छळ सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.
माहितीनुसार 29 वर्षीय आदिवासी दिव्यांग मुलीला रिटायर्ड IAS महेश्वर पात्रा यांची पत्नी सीमा पात्रा यांनी घरकाम करण्यासाठी 8 वर्षांपासून ओलिस ठेवलं आहे. पीडितेला पुरेसं जेवण दिलं जात नव्हतं शिवाय तिला रॉडनं मारहाण केली जायची. सोबतच गरम तव्यानं चटकेही दिले जायचे. सध्या तिला कैदेतून मुक्त करत रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुसरीकडे सीमा पात्रा यांनी आपल्यावर केलेले आरोप खोटे असल्याचं सांगितलं आहे. मला फसवण्यात आलं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
राज्यपाल बैस यांनी व्यक्त केली नाराजी
राज्यपाल रमेश बैस यांनी सीमा पात्रा प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पोलिसांना खडसावत म्हटलं आहे की, त्यांनी दोषीविरोधात काही कारवाई का केली नाही. पीडित आदिवासी महिलेची राष्ट्रीय महिला आयोगाच्या टीमनं भेट घेतली. तिची चौकशी केली असून लवकरच रिपोर्ट दिला जाईल, असं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.
8 वर्षांपासून बंदी, आजारी पडल्यावर उपचारही नाही
पात्रा दाम्पत्य रांचीमधील व्हीआयपी परिसर असलेल्या अशोकनगरमध्ये राहते. पीडितेनं सांगितलं की, ती गुमला येथील राहणारी आहे. सीमा पात्रा यांना दोन मुलं आहेत. मी काम सोडायचं आहे असं सांगितल्यावर सीमा पात्रा यांनी मला बंदी बनवलं. मला मारहाण केली जायची. आजारी पडल्यावर उपचार देखील केले जात नव्हते, असं पीडितेनं सांगितलं. पीडितेनं आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविषयी आपल्या नातेवाईकाला कसंबसं मेसेज करुन माहिती दिली. यानंतर अरगोडा पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. त्यानंतर रांची पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या टीमनं पीडितेला रेस्क्यू केलं.
सीमा 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' अभियानाच्या संयोजक
सीमा पात्रा यांच्या पती महेश्वर पात्रा हे राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव होते. तिथूनच ते सेवानिवृत्त झाले. सीमा पात्रा या भाजप नेत्या देखील राहिल्या आहेत. शिवाय त्यांनी 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' अभियानाच्या संयोजक म्हणून देखील काम केलं आहे. 1991 मध्ये सीमा पात्रा यांनी पलामू लोकसभा क्षेत्रातून निवडणूक लढवली होती. त्या 2 वर्ष काँग्रेसमध्ये देखील होत्या. सीमा पात्रा यांनी काही सिनेमात छोट्या भूमिका देखील निभावल्या आहेत.























