श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी विरोधी कारवाईमध्ये झालेल्या एका चकमकीत सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. सुरक्षा दलाने एकूण पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं असून त्यामध्ये लष्कर-ए-तोयबाचा जहाल दहशतवादी  युसूफ दार उर्फ कांतरू यांचा समावेश आहे. ही चकमक बारामुल्ला परिसरात झाली असून सुरक्षा दलाच्या यशामुळे एक मोठा कट उधळल्याचं सांगितलं जातंय. या चकमकीत मारल्या गेलेल्या दहशवाद्यांमध्ये दोन दहशतवाही हे लष्कर-ए-तोयबाचे असून तीन दहशतवादी हे स्थानिक असल्याची माहिती आहे. 


काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, या हल्ल्यामध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा जहाल दहशतवादी युसूफ दार उर्फ कांतरू याचा समावेश आहे. कांतरूने नुकतंच जम्मू काश्मीरच्या पोलीस दलातील एसपीओ, त्यांचा भाऊ, एक जवान आणि एका नागरिकाची हत्या केली होती. त्या आधीही या दहशतवाद्याने अनेक नागरिकांची आणि सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांची हत्या केल्याने तो मोस्ट वॉन्टेड दहशतवादी होता. 


गेल्या काही दिवसांपासून बारामुल्लाच्या खोऱ्यात सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरू आहेत. या खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांकडून टार्गेट किलिंगची रणनीती आखण्यात आली असून त्याद्वारे गेल्या काही दिवसांमध्ये ठराविक नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. त्यामध्ये काही सरपंच आणि पोलिसांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे. 


गेल्या आठवड्यामध्ये जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी ही घटना घडली होती. काश्मीरच्या दक्षिण भागातील कोकरनागमधील वटनार परिसरात सुरक्षा दलाला दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सुरक्षा दलांनी त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू केलं. त्यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीमध्ये एक जवान शहीद झाला होता. 


महत्त्वाच्या बातम्या: