Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांनी (Terrorist) भ्याड कृत्य केले आहे. बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांनी भाजप समर्थक सरपंचाची गोळ्या झाडून हत्या केली आहे. मंजूर अहमद बांगरू असे हत्या झालेल्या सरपंचाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील गोशबाग परिसरात एका दहशतवाद्याने शुक्रवारी सायंकाळी बांगरू यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर तो तेथून पळून गेला. या घटनेत बांगरू गंभीर जखमी झाले. त्यामुळे स्थानिकांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. घटना घडलेल्या संपूर्ण परिसराला सुरक्षा दलांनी वेढा घातला आहे. दरम्यान, या महिन्यात दक्षिण काश्मीरमध्ये काश्मीर बाहेरील मजूर आणि नागरिकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची ही सहावी घटना आहे. काश्मीर बाहेरील नागरिकांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केले जात आहे.
याआधीही 3 एप्रिल रोजी पुलवामाच्या लिट्टर भागात पठाणकोट येथील रहिवासी असलेल्या एका नागरिकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. याबरोबरच बिहारमधील रहिवासी असलेल्या दोन मजुरांवरही दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. तर शोपियानच्या छोटीगाममध्ये एका काश्मिरी पंडितावर हल्ला केला होता. शिवाय 13 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी एका नागरिकाची हत्या केली होती.
चार दहशतवाद्यांचा खात्मा
गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाच्या चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर चकमकीच्या ठिकाणी जात असताना अपघातात तीन जवानांचा मृत्यू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या