Amarnath Yatra 2023 : पवित्र अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra) सध्या खराब हवामानामुळे स्थगित करण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेदरम्यान गेल्या दोन दिवसांत सहा यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृत्यू झालेल्या यात्रेकरुंची संख्या वाढली आहे. यंदाच्या यात्रेदरम्यान आतापर्यंत एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 यात्रेकरु जखमी झाले आहेत. दरम्यान, काश्मीरमध्ये शुक्रवारी मुसळदार पाऊस सुरु होता. यामुळे अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. श्री अमरनाथ श्राइन बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली असून हवामान पूर्ववत झाल्यावर यात्रेला पुन्हा सुरुवात करण्यात येईल.


यात्रेदरम्यान 9 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी


अमरनाथ यात्रेदरम्यान गेल्या दोन दिवसांत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अमरनाथ गुहा दक्षिण काश्मीर हिमालयातील 3,888 मीटर उंचीवर आहे. अधिक उंच ठिकाणी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे याठिकाणी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.  या यात्रेकरूंची मृत्यू याच कारणामुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यात्रेदरम्यान आतापर्यंत 25 जण जखमी झाले आहेत. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये आठ प्रवासी आणि एका आयटीबीपी जवानाचा समावेश आहे.


अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित


अमरनाथ यात्रेची एक शुक्रवारी पहाटे बाबा बर्फानी यांच्या गुहेकडे रवाना करण्यात आली होती, मात्र त्यांना मध्येच थांबवण्यात आली. खराब हवामानामुळे बालटाल आणि नुनवान येथील यात्रा स्थगित करण्यात आली. यात्रा तात्पुरती स्थगित करत यात्रेकरुंना पुन्हा बेस कॅम्पमध्ये पाठवण्यात आलं. खराब हवामानामुळे कोणत्याही यात्रेकरूला पवित्र गुहेकडे जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. मुसळधार पावसामुळे अमरनाथ गुहेकडे जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळणे किंवा इतर अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे यात्रा सध्या थांबवण्यात आली आहे. श्री अमरनाथ श्राइन बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवामान पूर्ववत झाल्यानंतरच यात्रेकरूंना पुढील तीर्थयात्रा पूर्ण करण्याची परवानगी दिली जाईल.


आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्था


जम्मू-काश्मीर प्रशासन आणि श्री अमरनाथ श्राइन बोर्डाकडून अमरनाथ यात्रेदरम्यान सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. संपूर्ण यात्रेच्या मार्गावर तपासणी करण्यात येत असून त्यासाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात्रेकरुंसाठी आरोग्य सुविधांची तयारी करण्यात आली आहे. यात्रेदरम्यान आरोग्य सुविधा देण्यासाठी दोन रुग्णालयांचे उद्घाटन करण्यात आलं आहे. बालटाल आणि चंदनवारी येथे 100 खाटांची दोन रुग्णालये बांधण्यात आली आहेत. सुरक्षेसाठी यात्रामार्गावर ड्रोनमार्फत प्रशासनाची करडी नजर आहे. 1 जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरु करण्यात आली असून, ही 30 ऑगस्टला संपणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Jammu Kashmir : अमरनाथ यात्रेदरम्यान मोठा कट उधळला! परफ्यूम बॉटलमध्ये बॉम्ब, 4 आयईडीसह लष्कर-ए-तोएबा संबंधित एकाला अटक