Jammu Kashmir News : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी  हल्ले कायम सुरुच असतात. त्यामुळे सुरक्षा दल आणि प्रशासनाकडून दहशतवादी कारवायांना नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरुच असतात. जम्मू आणि काश्मीरमधील अनेक तरुणांना दहशतवाद पसवण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. त्यामुळे येथील हल्ले होत असतात. या दहशतवाद पसरवण्याच्या या प्रयत्नांना आवर घालण्यासाठी आता सुरक्षा दलाने सुमारे 250 दहशतवाद्यांची यादी जारी केली आहे. या यादीतील सर्वांची संपत्ती आता जप्त करण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये बसलेले दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील तरुणांना दहशतीचा मार्ग निवडण्यासाठी प्रवृत्त करतात, असं सुरक्षा यंत्रणांनी सांगितलं आहे.


सुरक्षा यंत्रणा मोठ्या कारवाईच्या तयारीत


काश्मीर खोऱ्यानंतर जम्मूतील दहशतवादाला आळा घालण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी डोडा, किश्तवाड आणि रामबन जिल्ह्यांतील सुमारे 250 दहशतवाद्यांची यादी तयार केली आहे, ज्यांच्यावर लवकरच सर्जिकल स्ट्राइक केलं जाणार आहे. सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये बसलेले दहशतवादी भारताविरोधात सातत्यानं कट रचत आहेत. आता सुरक्षा यंत्रणा या दहशतवाद्यांची मालमत्ता जप्त करणार आहेत.


तीन जिल्ह्यांमध्ये अशांतता पसरवण्याचा कट


एकेकाळी दहशतवादासाठी कुप्रसिद्ध असलेल्या जम्मू विभागातील रामबन, डोडा आणि किश्तवाड या जिल्ह्यांमध्ये सध्या दहशतवादी कारवाया शांत आहेत, ही शांतता पाकिस्तानला पचवता आलेली नाही. जम्मूतील या तीन जिल्ह्यांमध्ये अशांतता पसरवण्याचा आणि येथील तरुणांना फसवून त्यांना दहशतवादाच्या मार्गावर ढकलण्याचा प्रयत्न पाकिस्तान सातत्यानं करत आहे. मात्र, सुरक्षा दलांना पाकिस्तानच्या कारस्थानाचा सुगावा लागला असून सुरक्षा दलांनी या तीन जिल्ह्यांतील सुमारे 250 दहशतवाद्यांची यादी तयार केली आहे, जे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये बसून भारताविरुद्ध कट रचत आहेत. सुरक्षा दलांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये बसलेल्या या दहशतवाद्यांच्या यादीसह, त्यांच्या संपत्तीची संपूर्ण माहितीही सुरक्षा यंत्रणेकडे आहे आणि लवकरच या सर्व मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.


दहशतवादी तरुणांना दहशतवादासाठी प्रवृत्त करतात


पाकव्याप्त काश्मीरमध्ये बसलेले दहशतवादी तरुणांना चुकीचा मार्ग अवलंबण्यास प्रवृत्त करतात. सुरक्षा यंत्रणांनी सांगितल्याप्रमाणे, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये बसलेले हे 250 दहशतवादी सक्रिय दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या इशाऱ्यावर केवळ डोडा, किश्तवाड आणि रामबनमधील आपल्या नातेवाईकांनाच नव्हे तर येथील निष्पाप तरुणांनाही दहशतीचा मार्ग निवडण्यासाठी प्रवृत्त करत ​आहेत.


अमरनाथ यात्रेदरम्यान मोठा कट उधळला!


काही दिवसांपूर्वीच सुरक्षा दलांनी मोठा दहशतवादी कट उधळून लावला होता. श्रीनगरमध्ये 'लष्कर-ए-तोएबा' दहशतवादी संघटनेसंबंधित एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 4 परफ्युम आयडी जप्त करण्यात आले. सध्या अमरनाथ यात्रा सुरु असताना जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता पाहता प्रशासनाकडून सुरक्षेसाठी विविध पाऊलं उचलली जात आहेत.